जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात करण्यात आलेल्या आहेत. कॉपी मुक्त अभियानाचा भाग म्हणून संवेदनशील केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इ. 12 वी व इ. 10 वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली व प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्र प्रणालीव्दारे बैठक घेण्यात आली.
या दूरचित्र प्रणाली बैठकीमध्ये मुख्य सचिव यांनी यावर्षी होणाऱ्या इ. 12 वी व इ. 10 वी परीक्षांच्या धर्तीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येणार आहे. परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.
जिल्हयातील सर्व विभागाच्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची फेशियल रेकग्निशन सिस्टम व्दारे तपासणी करण्यात येईल.