दिल्लीत भीषण स्फोट; १० जणांचा मृत्यू, दिल्ली व मुंबईत हाय अलर्ट

0

दिल्लीत भीषण स्फोट; १० जणांचा मृत्यू, दिल्ली व मुंबईत हाय अलर्ट

नवी दिल्ली :राजधानी दिल्ली हादरवणाऱ्या भीषण स्फोटाची घटना आज संध्याकाळी  सात वाजेच्या सुमारास लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळील पार्किंग परिसरात घडली. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटानंतर दिल्ली, मुंबई तसेच देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारचा अचानक स्फोट झाला आणि काही क्षणांतच गाडी आगीत वेढली गेली. आगीचा भडका एवढा तीव्र होता की शेजारी उभ्या असलेल्या तीन कारही जळून खाक झाल्या. सुरुवातीला हा गॅस सिलिंडर स्फोट असल्याची चर्चा होती, परंतु स्फोटाचा आवाज, ज्वाळांची तीव्रता आणि स्फोटानंतर झालेली हानी पाहता हा गंभीर स्वरूपाचा स्फोट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून, कारमधून बाहेर काढलेल्या अनेक जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत दहा मृतदेह सापडले असून, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

या घटनेनंतर एनएसजी आणि फॉरेन्सिक विभागाच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब गोळा केले जात आहेत.

दिल्ली पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. स्फोटानंतर संपूर्ण दिल्ली आणि मुंबईत सुरक्षा अलर्ट वाढविण्यात आला असून रेल्वे स्थानके, विमानतळ, तसेच गर्दीच्या भागांमध्ये सतर्कता वाढवली गेली आहे.

या घटनेने दिल्लीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्फोटाचे नेमके कारण आणि त्यामागील स्वरूप तपासानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.