लोकशाही संपादकीय लेख

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार अर्थात महायुतीचे उमेदवार नंदू महाजन हे 583 मते मिळवून सर्वाधिक मताने विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे उभाठा गटाच्या उमेदवाराला अवघी 17 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार ज्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्याला माघार घेतली त्या अनिल चौधरी यांना 11 मते पडली, तर दुसरे बंडखोर उमेदवार शिवसेनेच्या रेश्मा काळे यांना अवघे एक मत मिळाले. त्यांनी आपली बंडखोरी माघार घेऊन महायुतीचे उमेदवार नंदू महाजन यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतंत्रपणे भेटून आपली उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर केले होते. एकूण 630 उमेदवारांपैकी मतदानापैकी भुसावळच्या दोघांची अनुपस्थिती होती, तर चाळीसगावच्या अनिल देशमुख गटाच्या 12 सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. एकूण 306 मताचा कोटा देण्यात आला होता. त्यापैकी नंदू महाजन यांना 583 मते मिळून ते सर्वाधिक मताने विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपचे 250 मते होती. शिवसेनेचे 160 मते होती, तर बाकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, तसेच सुमारे 80 ते 85 अपक्ष उमेदवार होते. बाकी शिवसेना उभाठा गटाचे उमेदवार होते. त्यामुळे नंदू महाजन यांना अपक्ष सदस्यांची देखील मते मिळाली.
भाजप २५० आणि शिवसेना शिंदे गटाचे एकूण 160 मिळून 410 सदस्य होतात. नंदू महाजन यांना 410 पेक्षा जास्त म्हणजे 583 मते मिळाली आहेत. म्हणजे त्यांचा अर्थ अपक्षाबरोबर महाविकास आघाडीचे मते देखील फुटली आहेत. ती नंदू महाजन यांना मिळाली आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला माघार घेणाऱ्या अनिल चौधरी या अपक्ष उमेदवाराला 11 मते मिळाली. म्हणजे ती भुसावळ नगरपालिकेतील असावीत असा अंदाज आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी माघार जरी घेतली नसली तरी त्यांना 11 पेक्षा जास्त मिळाली नसती, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सर्वात नाचक्की कोणाची झाली असेल तर ती महाविकास आघाडीचे शरद तायडे यांची झाली आहे. महाविकास आघाडीची मते सुद्धा त्यांना मिळाली नाही हे विशेष होय. हे आधीच कळून चुकले होते की, यावलच्या नगराध्यक्ष छाया पाटील यांनी आपले पती अतुल पाटील यांच्यासह भाजप कार्यालयातच भेट दिली होती. त्यांचे 13 मतदार सदस्य हे पूर्णपणे भाजपकडे वळले आहेत आणि ऐनवेळी सांगण्यात आले की, आमचा पेशंट मुंबईला आहे त्यासाठी आम्ही गिरीश महाजन यांची भेट घ्यायला आलो होतो. मतदानापूर्वी त्यांची ही भेट फार काही सांगून गेली, ते तितकेच खरे आहे. शिवसेना शिंदे गटाचे सर्व सदस्यांनी प्रामाणिकपणे युती धर्मा पाळला आहे. झाडून त्यांनी आपले मतदान महायुतीचे उमेदवार नंदू महाजन यांना केल्याचे स्पष्ट होते आहे. यानंतर किशोर आप्पा पाटील यांनी ट्वीट करून सांगितले की, शिवसेनेच्या सर्व मतदारांनी प्रामाणिकपणे मतदान करून युतीधर्मा पाळला आहे. नाशिकमध्ये बंडखोर उमेदवार गीते यांनी माघार घेतल्याचे दर्शवून आपला प्रचार सुरूच ठेवला आणि म्हणाले की, माझ्या मित्रांनी माझा प्रचार केला आणि या निवडणुकीत मला विजयी केले. वास्तविक मी माझा प्रचार केला नाही, हे तितकेच खरे आहे. मित्रांनी प्रचार व प्रसार करून मला विजयी केले आणि नाशिक मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गीते हे विजयी होऊन महायुतीचे दराडे यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
जळगावात 583 मताने नंदू महाजन विजयी होताच सर्व भाजप गोटात जल्लोष करण्यात आला. इतका मोठा हार बनविण्यात आला होता की तो क्रेनच्या सहाय्याने विजयी उमेदवार नंदू महाजन यांच्या गळ्यात टाकण्यात आला. त्यानंतर एक पूर्ण डंपर भरून गुलाल आणण्यात आला होता. त्या गुलालाची उधळण करण्यात आली. निवडून आल्यावर जंगी मिरवणूक काढण्यात आली आणि जल्लोष करण्यात आला. आता सर्व सदस्यांना तेथून ट्रीप वर घेऊन जाणार आहेत. ट्रिप मध्ये पूर्ण मौज मजा करण्यात येणार आहेत. निवडून आल्यानंतर नंदू महाजन यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मला माझ्या महायुतीच्या उमेदवारांनी तर मतदान केलेच, परंतु अपक्ष सदस्यांनी सुद्धा मला मतदान केले. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी मला मतदान केले. म्हणून मी सर्वाधिक मतांनी विजयी झालो. त्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानतो. नंदू महाजन यांना भाजपची म्हणजेच महायुतीची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. त्यानंतर सर्व बंडखोरांनी माघार घेतल्यामुळे तो विजय आणखी सोपा झाला. नंदू महाजन यांचे अभिनंदन..!


