संतापजनक; छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीचे वादग्रस्त वक्तव्य…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असतानाच आता भाजप प्रवक्त्याच्या वक्तव्याने यात आणखी भर घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळेस माफीचे पत्र लिहिले, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर केले आहे.

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे वक्तव्य करताच भाजपने त्यांना टिकेचे लक्ष्य केले आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते या वृत्तवाहिनीवर आले होते. मात्र, सावरकरांच्या माफीनाम्यावर बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, सावरकरांच्या काळात अशी निवेदने देऊन माफी मागणे सामान्य होते. सावरकरच नव्हे तर, छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबास असे पाच पत्र लिहिले होते.

यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्यावरून भाजपवर टीका केली आहे. भाजपची हीच भूमिका आहे का?, हे भाजपने स्पष्ट करावे, असे राऊत म्हणाले आहे. तसेच, राष्ट्रीय प्रवक्ते वृत्तवाहिनीवर जे काही बरळलेत ती भाजपची भूमिका नसेल तर प्रवक्त्यावर कारवाई करावी, अशी मागणीही राऊतांनी केली. या वक्त्यावरून राऊतांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. राऊत म्हणाले, भाजपचे प्रवक्ते शिवरायांचा अपमान करत असतील तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेतात? नौदलाला शिवरायांचे बोधचिन्ह का देण्यात आले आहे? असा सवालही त्यांनी केला.

सुधांशु त्रिवेदी यांचे हे वक्तव्य समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे वक्तव्य ठार वेडाच करू शकतो, अशा शब्दांत आव्हाडांनी त्रिवेदींना सुनावले.

Leave A Reply

Your email address will not be published.