‘त्या’ लाडक्या बहिणींची आम्ही व्यवस्था करु!

खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य

0

 

कोल्हापूर

लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करू, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळला असून या वक्तव्याविरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी जोरदार हल्लाबोल करत निषेध व्यक्त केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. महायुतीने महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देत आहे. तर आताच्या जाहीरनाम्यात महायुतीचे सरकार आले तर 2100 रुपये देणार असल्याचे म्हटले आहे. तर महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांचे सरकार आले तर दर महिन्याला 3000 रुपये देण्यार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

या योजनाना घेऊन महायुतीतील प्रत्येक उमेदवार आणि नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत. अशातच आता कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी चक्क ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवरुन महिलांना जाहीर सभेत स्टेजवरुन दम भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेत्यांनी याबाबत ट्वीट (एक्स) केले असून धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावरुन तीव्र पडसाद उमटत आहेत.

 

घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं…

खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर टीका करताना महायुतीने देखील काय केले हे सांगत असताना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत दिसले. तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो, अशा शब्दात लाडक्या बहिणींना एकप्रकारे दमच भरला. यावेळी बोलताना ते म्हणाले, या ठिकाणी काँग्रेसची रॅली निघाली, तर त्या रॅलीमधील महिलांचे फोटो काढा. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला 1500 रुपये घेतात, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं असं अजिबात चालणार नाही असे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.