जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपचे रावेर क्षेत्रप्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्यावर पक्षाने विश्वास व्यक्त करत त्यांना उमेदवारी बहाल केली आहे. ते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून जळगाव मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. महाविकास आघाडी आणि महायुतीतील विविध नेत्यांची नावे चर्चेत होती. शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. याशिवाय आमदार किशोर पाटील यांचे पुत्र तथा नगरसेवक सुमित पाटील यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती.
दुसरीकडे भाजपमध्येही उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांची नावे समोर आली होती. उद्योग क्षेत्रातील नंदू अडवाणी, पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके, डॉ. केतकी पाटील, पाचोरा येथील पदाधिकारी अमोल शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर यांची नावे चर्चेत होती. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनीदेखील निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. मात्र सर्व चर्चांना पूर्णविराम देत भाजपने नंदकिशोर महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पक्ष संघटनेत दीर्घकाळ सक्रिय राहून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना संधी दिल्याचे मानले जात आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर या निवडणुकीतील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


