लोकशाही संपादकीय लेख
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागलेली आहे. विशेषतः जळगाव महानगरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फार मोठा धक्का बसला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन माजी महापौर यांच्यासह 15 नगरसेवकांचा परवा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करीत प्रवेश झाला. वास्तविक भाजपची जळगाव महानगरपालिकेत स्थिती चांगली आहे. त्यामुळे त्यांना इतर पक्षातील सदस्यांची अशी आवश्यकता नाही. परंतु जळगाव महानगरपालिकेत भाजपला एक हाती सत्ता हवी आहे. विरोधक त्यांना शिल्लकच ठेवायचा नाही. त्यामुळे भाजप महायुतीतील इतर पक्षांशी युती करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. याचा परिणाम भाजप सर्वपक्षीय निष्ठावंतांच्या भावनेचा विचार होणे सुद्धा आवश्यक आहे. भाजपच्या निष्ठावंतांमध्ये मोठ्या इन्कमिंगमुळे नाराजीचा सूर उमटत आहे. त्यातच महायुतीतील एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तर महायुती म्हणून विचारच केला जात नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी उमेदवारांच्या जागा वाटपावरून वाद निर्माण सुरू झाला आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी महापौर नितीन लढ्ढा हे कोठेही असले तरी ते विनिंग कॅंडिडेट आहेत. तसेच ते अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. त्यांचा जळगाव महानगरपालिके विषयी दांडगा अभ्यास आहे. तसेच प्रशासनाकडून काम करून घेण्याची त्यांच्याकडे कला आहे. त्यामुळे नितीन लढ्ढा यांच्या भाजप प्रवेशा विषयी कोणीही नाराज असण्याचे कारण नाही. उलट अशा प्रकारचा अभ्यासू नेता भाजपाला हवा आहे. तसेच ते मंत्री गिरीश महाजन यांच्या ‘गुड बुक्स’मध्ये देखील आहेत. त्या उलट माजी महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती माजी विरोधी पक्ष नेता सुनील महाजन यांच्या विषयी भाजपात फार मोठी नाराजी दिसून येत आहे. केवळ हे दोघेजण माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांना मंत्री गिरीश महाजनांनी भाजपात प्रवेश दिला. पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे 75 पैकी 57 नगरसेवक निवडून आले असताना माजी महापौर जयश्री महाजन आणि सुनील महाजन यांनी भाजपमध्ये फूट पाडून भाजपला सुरुंग लावून शिवसेनेची सत्ता आणली. महापौरपद जयश्री महाजन यांना मिळाले होते. भाजपच्या उमेदवाराला फोडून उपमहापौर देखील बनवले. त्यामुळे भाजप श्रेष्ठींपासून ते भाजपच्या निष्ठावान नगरसेवकांमध्ये त्यांचे विषयी कमालीचा विरोध होता. आता त्यांनाच पक्षात घेतल्यामुळे त्यांची प्रचंड नाराजी झाली आहे. म्हणून भाजप पक्षाची ताकद संख्येने वाढली असली तरी निवडणुकीत त्याचा कसा परिणाम होतो हे नंतरच स्पष्ट होईल. आज भाजपचे निष्ठावंत जाहीरपणे बोलत नसले, तरी त्यांचे विषयी आतून खदखद सुरू आहे, एवढे मात्र निश्चित..!
जळगाव महानगरपालिकेचे प्रशासन गेल्या सहा सात वर्षाच्या कालावधीत पूर्णपणे कोसळले आहे. जळगावकरांच्या नागरी समस्यांचे समाधान होत नाही. गेल्या दोन वर्षाच्या प्रशासकीय काळात तर प्रशासनाचे पूर्ण धाबे दणाले आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून जळगाव शहरातील रस्त्यांची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. अलीकडे रस्त्यांसाठी मोठा निधी मिळाला परंतु कंत्राटदारांचे पैसे दिले गेले नसल्याने रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे जळगाव शहरात अनेक भागात रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. प्रमुख रस्त्यांची कामेही अडकलेली आहेत. अवकाळी पावसाने तर कहरच केला आहे. त्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीमुळे आधीच शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून खड्ड्यांनी रस्ते व्यापले आहेत. त्यामुळे खड्डे मृत्यूचे सापळे बनले आहेत. तसेच ज्या भागात रस्ते झालेले नाहीत तेथील रस्त्यांवर चिखलच चिखल झाल्याने रहिवाशांची फार मोठी नाराजी आहे. शहरातील खराब रस्ते निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपने हे लक्षात घ्यायला पाहिजे की, निवडणुकीत जर जळगावकरांचे समाधान करू शकले नाहीत तर त्यांना सुद्धा निवडणुकीत नागरिक धडा शिकवतील, त्यात शंका नाही. अति आत्मविश्वासात भाजपने राहू नये, कारण जळगावकर गेल्या वर्षापासून नगरपरिषद प्रशासनावर नाराज आहेत. अमृत पाणीपुरवठा पूर्णपणे अद्याप सुरू झालेली नाही. अमृत योजनेचे जे पाणी मिळते ते दररोज मिळण्याची अपेक्षा होती, परंतु दोन दिवसात पाणी मिळते; तेही पूर्ण क्षमतेने मिळत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत जी तत्परता अमृत योजनेवर दाखवायला हवी होती ती महापालिका प्रशासन दाखवत नाही. शहर स्वच्छतेच्या बाबतीत शहरवासीय समाधानी नाहीत. कचऱ्याचे ढीग ठीकठिकाणी साठलेले दिसून येतात. अनेक भागात गटारी नसल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या सर्व बाबींवर भाजपतर्फे कशा प्रकारची मुक्तता केली जाते, यावरच त्यांचे यश अवलंबून आहे..!