भाजपाला ‘मुक्ताई’ पावलीच नाही!

0

 

मन की बात
दीपक कुलकर्णी 

 

परब्रह्मी चित्त निरंतर धंदा । तया नाही कदा गर्भवास ॥
उपजोनी जनी धन्य ते योनी । चित्त नारायणी मुक्तलग ॥
अव्यक्ती पै व्यक्ति चित्तासि अनुभव । सर्व सर्वी देव भरला दिसे ॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान उन्मनी विज्ञान । चित्त नारायण झाले त्याचे ॥
आदि अंती हरि सर्व त्याचा जाला । परतोनि अबोला प्रपंचेसी ॥
मुक्ताईचे चित्त निरंतर मुक्त । हरि हेचि संचित आम्हांघरी ॥

 

मुक्तार्इंच्या पावन भूमीत विधानसभा निवडणुकीची सध्या हवा दाटून आली आहे. उमेदवार घोषित होण्याअगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटून महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले आहे. सुरुवातीपासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा हक्काचा आणि बालेकिल्ला राहिला आहे. भाजपाचे तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करीत होते. सन 2019 मध्ये एकनाथराव खडसेंचा पत्ता कट करीत त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी देत भाजपानेच भाजपाचा (खडसे परिवराचा) काटा काढत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना छुपे बळ दिले होते.

अपक्ष असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीपासून शिवसेनेला आपला पाठींबा दर्शविला होता. शिवसेनेत फुट पडल्यानंतर त्यांनी राजकीय वादळाचा वेध घेत शिंदेंच्या शिवसेनेला बळ दिले. सन 2024 च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचा पत्ता कट केला जार्इल अशी कोल्हेकुर्इ उठविण्यात आली. भाजप आपला गड कायम राखण्यासाठी मध्यंतरी चांगलाच कामाला लागला. आमची जागा आम्हीच लढविणार असा बंडाचा विडा भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी उचलला आणि तसा दबाव वरिष्ठांवर टाकण्यास सुरुवात देखील केली.

महायुतीच्या फॉम्युर्ल्यानुसार जाचा विद्यमान आमदार त्यालाच ती जागा या तत्त्वात ही जागा अपक्षाला सोडायची का? असा हेका भाजप नेते धरु लागले. चंद्रकांत पाटील यांनी केवळ शिंदेंच्या शिवसेनेला पाठींबा दिला आहे, ते पक्षाचे सदस्य नाहीत असे वातावरण भाजपाने निर्माण केल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र शिंदेसेनेने हा पेच अतिशय लिलया सोडविला आहे. भाजपाने पहिली उमेदवार यादी जाहीर करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्तार्इनगरात महायुतीच्या मेळाव्यातून चंद्रकांत पाटील यांना गळाला लावत त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश करुन घेत उमेदवारी देखील जाहीर करुन टाकली. महायुतीचा मेळावा असल्याने भाजपाचे काही आमदार, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांना उपस्थित राहणे क्रमप्राप्त झाले. डॉ. फडकेंनी तर भाषण झाडून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा संकल्प देखील सोडला.

एकंदरीत भाजपाने धरलेला हट्ट शिंदेसेनेसमोर पुरा झालेला नाही. महायुतीसाठी ही निवडणूक अस्तित्वाची असून त्यांना एक-एक जागा जिंकणे गरजेचे झाले. लोकसभा निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करीत युती धर्म पाळला होता; तोच धर्म आता भाजपाला निभवावा लागणार आहे.

 

अव्यक्ती पै व्यक्ति चित्तासि अनुभव । सर्व सर्वी देव भरला दिसे ॥

या अभंगाच्या ओळीप्रमाणे भाजपाला व्यक्ती पाहून नाही तर युती धर्म म्हणून काम करावे लागणार आहे. भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मुक्तार्इनगर विधानसभा मतदारसंघासाठी श्रेष्ठींकडे घातलेला पिंगा गुंडाळला गेला असून भाजपाला ‘मुक्तार्इ’ उमेदवारीच्या माध्यमातून पावली नाही असेच म्हणावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.