भाजपकडून उमेदवारांसाठी कडक चाचणी

0

भाजपकडून उमेदवारांसाठी कडक चाचणी

२६ प्रश्नांची प्रश्नावली, ‘निष्ठेचे प्रतिज्ञापत्र’ अन् बंडखोरी रोखण्याची दुहेरी रणनीती

जळगाव प्रतिनिधी शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारी इच्छुकांसाठी अत्यंत कडक निकष लागू केले असून, प्रत्येक इच्छुक कार्यकर्त्याला २६ प्रश्नांची सविस्तर प्रश्नावली भरून देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा मुद्दा म्हणजे ‘निष्ठेचे प्रतिज्ञापत्र’. मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून, तिकीट कोणालाही मिळाले तरी संघटनेचा निर्णय मान्य करीन, व्यक्तीपेक्षा संघटनेला मोठे मानून पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी समरसून काम करीन, अशी लेखी हमी प्रत्येक इच्छुकाकडून घेण्यात आली आहे.

महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार ठरवताना भाजपने यंदा केवळ इच्छा व्यक्त करणाऱ्यांवर समाधान न मानता, विजयाची गणिते मांडू शकणारे आणि प्रभागाची सखोल माहिती असणारे इच्छुकच पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इच्छुकांच्या निवडीसाठी कडक ‘फिल्टर’ लावण्यात आला असून, पक्षाची ही भूमिका स्पष्टपणे दिसून येत आहे.

प्रश्नावलीत ‘तुम्हालाच उमेदवारी का द्यावी?’ या थेट प्रश्नातून इच्छुकांची तयारी तपासण्यात आली आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना इच्छुकांना स्वतःच्या तीन प्रमुख ताकदी स्पष्ट कराव्या लागल्या आहेत. केवळ आकडेवारी नव्हे, तर भविष्यातील विकासाचे व्हिजन, प्रभागातील तरुण संघटनांशी असलेला संपर्क, तसेच पक्षाशी किती नवे कार्यकर्ते जोडले गेले, यावरून जनसंपर्क आणि संघटन कौशल्याची चाचणी घेण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रश्नावलीतील सर्वाधिक पेचात टाकणारा प्रश्न म्हणजे, ‘पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर तुमची भूमिका काय असेल?’ या एका प्रश्नातून भाजपने इच्छुकांच्या मनातील सुप्त हालचाली, नाराजी आणि भविष्यातील संभाव्य बंडखोरीचे संकेत आधीच ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिज्ञापत्रात तिकीट न मिळाल्यास पक्षाविरुद्ध बंडखोरी न करता, अपक्ष उभे न राहता, पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठीच काम करेन, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, इच्छुकांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतल्यानंतरही भाजपने उमेदवारांची यादी तातडीने जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिकीट मिळणार की नाही, या चिंतेत इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. काही इच्छुक तर ‘तिकिटासाठी देव पाण्यात घालून’ बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रश्नावलीत प्रभागाचा संपूर्ण राजकीय व तांत्रिक डाटा सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. जातनिहाय समीकरणे, निर्णायक मतदारांचे विश्लेषण, बुथची अचूक संख्या, सध्याचे नगरसेवक, मागील निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार, तसेच इतर पक्षांचे संभाव्य तगडे उमेदवार कोण असू शकतात, याची सविस्तर माहिती विचारण्यात आली आहे. प्रतिस्पर्ध्यांची ताकद किती आहे, याचा अंदाजही या माध्यमातून घेतला जात आहे.

‘मेरिट’वर उमेदवार ठरवणे आणि ‘प्रतिज्ञापत्रा’द्वारे पक्षशिस्तीचा बडगा उचलणे, अशी दुहेरी रणनीती भाजपकडून राबवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनपाच्या रिंगणात उतरण्यापूर्वी उमेदवारांना जणू ‘लेखी परीक्षा’ पास करावी लागत असून, यात कोणाचे नशीब उजळते आणि कोण निष्ठेच्या कसोटीवर उतरते, याकडे संपूर्ण जळगावच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.