निरीक्षक म्हणून रुपाणी, सीतारामन यांची निवड
भाजपकडून मुख्यमंत्री कोण? : चार डिसेंबर रोजी होणार गटनेता निवड
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपापल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केलेली आहे. पण सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने अद्याप तरी विधिमंडळ गटनेता निवडलेला नाही. दि. 4 डिसेंबरला भाजपकडून विधिमंडळ गटनेता निश्चित करण्यात येईल. त्यासाठी भाजपच्या नेतृत्त्वाने दोन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
भाजपच्या नेतृत्त्वाने महाराष्ट्रासाठी निरीक्षक म्हणून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची निवड केलेली आहे. विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे पंजाबचादेखील प्रभार आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे आंदोलन पेटलेले असताना रुपाणी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद होते. विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन उद्या रात्री मुंबईत दाखल होतील. त्यानंतर गुरुवारी म्हणजेच दि. 4 डिसेंबरला सकाळी 11 वाजता भाजपच्या आमदारांची बैठक होईल. त्या बैठकीत विधिमंडळ गटनेता ठरवण्यात येईल. आमदारांशी संवाद साधून रुपाणी आणि सीतारामन त्यांच्याकडून सुचवण्यात आलेल्या नावांवर सहमती घेतील. विधिमंडळ गटनेत्याचे नाव निश्चित झाल्यानंतर ते निरीक्षकांकडून दिल्लीला कळवण्यात येईल.
भाजपकडून 4 डिसेंबरला विधिमंडळ गटनेता निवडला जाईल. त्यानंतर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल. दि. 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळा संपन्न होईल. मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 तारखेला होईल. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत. दि. 4 तारखेच्या बैठकीत मंत्र्यांची नावे निश्चित झालीच तर मग 5 तारखेला त्यांचाही शपथविधी सोहळा होईल.
गृहखात्यावरुन घोडे अडले
नव्या सरकारमध्ये भाजपला 21 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 12, राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे मिळू शकतात. मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर शिवसेना गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहे. पण गृह खाते सेनेला सोडण्यास भाजप तयार नाही. आधीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी गृहमंत्रिपद स्वत:कडे ठेवले होते. तर 2014 ते 2019 या कालावधीत मुख्यमंत्री असतानाही फडणवीस यांच्याकडेच गृह मंत्रालयाचा कार्यभार होता.