माजी मंत्र्यासह तिघांनी ‘कमळ’ कुस्करले !

भाजपला एकाच दिवशी तीन धक्के

0

 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

नवी मुंबईचे माजी आमदार संदीप नाईक, भंडारा जिल्ह्यातील भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार नीलेश राणे यांनी एकाच दिवशी भाजपला रामराम ठोकला. बडोले आणि राणेंनी राजकीय तडजोडीपोटी पक्ष सोडला, तर नाईकांनी नाराजीतून पाऊल उचलले. तसेच मिरा – भाईंदरच्या गीता जैन यांनीही आपला ‘पक्षमार्ग’ बदलल्याचे पाहायला मिळत आहे. या यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

 

बडोले राष्ट्रवादीत

भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत अर्जुनी- मोरगावातून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले. महायुतीत अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या पक्षप्रवेशानंतर आमदार मनोहर चंद्रिकापुरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. बडोले यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. बडोले हे अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून तयारी करीत होते. महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने उमेदवारीची अडचण निर्माण झाली होती. बडोले यांनी या मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधीत्व केले आहे.

2009 मध्ये त्यांनी 69,856 मते घेत काँग्रेसचे रामलाल राऊत यांचा 16,307 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये त्यांच्या मतांची टक्केवारी कमी झाली. मात्र प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार राजेश नंदागवळी यांचा 30,295 इतक्या भरघोस मतांनी त्यांनी पराभव केला होता. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणूनही त्यांची वर्णी लागली होती. त्यांच्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्लंड येथील घर मिळविण्यात बडोले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्यांदा सामाजिक न्याय विभाग गावखेड्यापर्यंत पोहचविला होता. 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी त्यांचा 718 मतांनी पराभव केला होता.

 

नीलेश राणे शिवसेनेत

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केला. महायुतीच्या जागावाटपात मालवण-कुडाळ हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या सल्ल्यानेच नीलेश राणे धनुष्यबाण हाती घेत आहेत. नीलेश राणेंसमोर ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचे आव्हान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.