जळगाव (राहुल पवार), लोकशाही न्यूज नेटवर्क
आदिवासी समाजासाठी खऱ्या अर्थाने क्रांतीसुर्य ठरलेल्या जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा उत्सव आणि आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचा भव्य वार्षिक मेळावा अति दुर्गम समजल्या जाणाऱ्या आणि आदिवासींचे प्रचंड वास्तव्य असलेल्या सातपुडा पर्वत परिसरात गारबर्डी येथील धरणाच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी इतर कुठेही दखल न घेतली गेलेल्या आदिवासी समाजाचे क्रांतीसुर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीची लोकशाहीने घेतलेली दखल आदिवासींसाठी अभिमानाची बाब ठरली. गारबर्डी येथील सुकी धरणाच्या पायथ्याशी झालेल्या या वार्षिक मेळाव्या प्रसंगी जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. सोबतच बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दैनिक लोकशाहीतर्फे काढण्यात आलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन देखील या वार्षिक मेळाव्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन अनिल तडवी (बांधकाम विभागाचे विभागीय अधिकारी), कामिल तडवी, अॅड राजीव तडवी, मुनाफ तडवी, सलीम तडवी, अॅड याकुब तडवी आदी आदिवासी समाजातील मान्यवर व दैनिक लोकशाहीचे यावल तालुका प्रतिनिधी रणजीत भालेराव उपस्थित होते. यावेळी सुमारे दोन हजाराहून अधिक आदिवासी बांधव उपस्थित होते.
यावेळी दैनिक लोकशाहीचे यावल तालुका प्रतिनिधी यांनी भरल्या अंतकरणाने आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, लोकशाहीच्या बिरसा मुंडा जयंती निमित्त काढलेल्या विशेष अंकाचे झालेले कौतुक ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या बावीस वर्षाच्या कारकिर्दीत आपण असा अनुभव आजवर घेतला नाही. आदिवासी समाजाने लोकशाहीच्या विशेष अंकाला दिलेले प्रेम हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. ही संधी दैनिक लोकशाहीने आपल्याला दिल्याबद्दल लोकशाहीचे विशेष आभार देखील त्यांनी व्यक्त केले.
आदिवासी हा खऱ्या अर्थाने पुरातन असा समाज असून सर्वसामान्यांपासून अति दुर्गम क्षेत्रात त्यांचे वास्तव्य असते. अशा आदिवासींच्या समस्यांसाठी क्रांतीसुर्य जननायक बिरसा मुंडा यांनी लढा दिला. त्यांचे देशाप्रतीचे बलिदान हे खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगे आहे. आदिवासींच्या या क्रांतीसूर्याच्या जयंतीचा कार्यक्रम आदिवासींसाठी विशेष मोलाचा असतो. यावेळी दैनिक लोकशाहीचे यावल तालुका प्रतिनिधी रणजीत भालेराव यांनी मोठ्या परिश्रमाने या क्रांतिकारकाची घेतलेली दखल विशेष कौतुकाची बाब ठरली.