नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
येत्या चार वर्षांमध्ये जगात पुन्हा एकदा कोरोनासारख्या आजाराची मोठी साथ येण्याची शक्यता आहे, असे भाकीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी वर्तवले आहे. पुढील चार वर्षांमध्ये जगात अशी साथ येण्याची 10 ते 15 टक्के शक्यता आहे, असे बिल गेट्स यांनी ‘वॉल स्ट्रीट जनरल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. बिल गेट्स यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील विविध देशांच्या आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.
जगात पुन्हा एकदा नैसर्गिक महामारी येण्याची शक्यता 10 ते 15 टक्के आहे, पुढील चार वर्षांमध्ये हे घडू शकते. कोरोनानंतर आपण अशा साथीचा सामना करण्यासाठी तयार आहोत, गेल्यावेळपेक्षा आपली परिस्थिती चांगली असेल, असा विचार करणे चांगली गोष्ट आहे. मात्र, प्रत्यक्षात आपली तयारी पूर्ण झालेली नाही. जगात कोरोनासारख्या आजाराचा पुन्हा उद्रेक झाल्यास आपण खरोखरच तयार नाही. कोरोनासारखी भीषण साथ भविष्यात पसरली तर तिला रोखण्यास जग सज्ज नाही, असे सांगताना बिल गेट्स यांनी जागतिक पातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सोयीसुविधांबाबत नाराजी व्यक्त केली.
बिल गेट्स गेल्या अनेक वर्षांपासून वैश्विक महामारीसंदर्भात सातत्याने बोलत आहेत. ते जगातील आजाराच्या साथी आणि त्यापासून मानवी जीवनाला असलेला धोका यासंदर्भात जनजागृती करत असतात. यापूर्वी बिल गेट्स यांनी एक वक्तव्य केले होते. त्यावेळी बिल गेट्स यांनी जग हे मोठा साथीचा आजार आल्यास तयार नसल्याचे वक्तव्य केले होते. 2019 साली कोरोनाची साथ आल्यानंतर त्यांचे हे भाकीत खरे ठरले होते. कोरोनाच्या महामारीत तब्बल 7 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. आपल्याकडे कोणत्या साधनांची कमतरता आहे याबद्दल जगातील सर्व देशांनी एकमताने निर्णय घेतले तर अनेक अडचणी दूर होतील. मात्र, जगातील बहुतांश देश जुन्या चुकांची पुनरावृत्ती करत आहेत, असे बिल गेट्स यांनी म्हटले.