उद्या १ फेब्रुवारी रोजी देशाचा आर्थिक अर्थसंकल्प सादर होणार असून, या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना महागाईतून काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र अर्थसंकल्पापूर्वीच दैनंदिन वापरातील अत्यावश्यक असलेल्या खाद्यतेलांच्या दरांनी पुन्हा एकदा मोठी उसळी घेतल्याने सर्वसामान्य ग्राहक, विशेषतः गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे.
अवघ्या एका महिन्यात शेंगदाणा तेलाचे दर प्रतिकिलो १५० रुपयांवरून थेट २१५ रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे घरगुती स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले असून महागाईचा फटका सामान्य कुटुंबांना बसत आहे. साधारणपणे सण-उत्सवांच्या काळात खाद्यतेलाची मागणी वाढल्याने दरात वाढ होते. मात्र यंदा दिवाळीच्या काळात दर स्थिर होते. कोणताही मोठा सण नसताना अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून स्थिर असलेले खाद्यतेलाचे दर आता वाढीच्या मार्गावर असून, सध्याची परिस्थिती पाहता येत्या काही आठवड्यांत दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या काही दुकानदारांकडे जुना साठा असल्याने तेल जुन्या दरात उपलब्ध आहे. मात्र नवीन साठा बाजारात दाखल होताच वाढलेले दर सर्वत्र लागू होण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका तेलबियांना बसला आहे. काही भागांत अपेक्षित पावसाचा अभाव तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे भुईमूग आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे बाजारात कच्च्या मालाची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम खाद्यतेलांच्या किमतींवर झाला आहे. डिसेंबर महिन्यात सोयाबीन तेल १२५ रुपये किलो होते, ते आता १५० रुपये किलोवर पोहोचले आहे. सूर्यफूल तेलाचे दर १४० रुपयांवरून १७० रुपये प्रतिकिलो झाले असून, शेंगदाणा तेलाने तर विक्रमी उसळी घेतली आहे. सणासुदीचा हंगाम नसतानाही अशी दरवाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.