लोकशाही न्यूज नेटवर्क
आसामसहित तीन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या मतदानादरम्यान काँग्रेसला आसाममध्ये मोठा धक्का बसला आहे. मतदान सुरू होण्याच्या काही तासाआधीच काँग्रेसचे उदलगुरी मतदारसंघातील उमेदवार सुरेन दायमारी यांनी माघार घेतली आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देखील दिला आहे.
सुरेन दायमारी यांनी माध्यमांशी संवाद साधत काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच निवडणुकीतून माघार घेत असल्याचेही स्पष्ट केले. दायमार यांनी निडवणुकीतून माघार घेतली असली तरी, त्यांचं नाव ईव्हीएममध्ये असणार आहेत. त्यांनी मतदानाच्या काही तास आधीच माघार घेत असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितलं की, ‘त्यांनी माध्यमांशी येऊन काँग्रेस पक्ष सोडल्याचे सांगितले. परंतु त्यांनी पक्षाला अधिकृतपणे राजीनामा पाठवलेला नाही’.
दायमारी यांनी म्हटलं की, ‘काँग्रेसमध्ये राहून काही फायदा नाही. माझ्यासोबत विश्वासघात झाला आहे. काँग्रेस केवळ अल्पसंख्यांकांसाठी काम करते. त्यांनी माझ्या आदिवासी समाजाला कोणताही अधिकार दिला नाही. त्यांच्यासाठी काही केलं नाही’.
‘काँग्रेसने मला उदलगुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. परंतु पक्षाने माझा प्रचार केला नाही. मी पक्षाकडे अनेकदा प्रचाराची मागणी केली. परंतु पक्षातील नेत्यांनी माझा फोन उचलला नाही. माझी कोणी मदत केली नाही, याचं दु:ख होत आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने देखील साथ दिली नाही, असे दायमारी यांनी सांगितले.

