अनेर-सातपुडा परीसरात बिबट्याचा धुमाकूळ ; १५ दिवसांत चार जनावरे फस्त
लासूर ता.चोपडा(वार्ताहर) – चोपडा तालुक्यातील सातपुडा व गणपूर परीसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून पंधरा दिवसांत तब्बल चार पाळीव प्राण्यांवर हमला करत फस्त केली आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी कर्जाने येथील आदिवासी शेतकर्याची गाय व त्यानंतर बरोबर चार चार दिवसांच्या अंतराने चौगाव येथील नाना भावसिंग राजपूत, प्रभाकर लक्ष्मण पाटील यांच्या शेतात बांधलेल्या बैलांवर रात्रीच्या वेळी हमला करत फस्त केले तर दि.१७ मार्च रोजी रात्री गणपूर शिवारातील साळुंखे भाऊसाहेब यांच्या शेतातील रखवालदार सखाराम महार्या बारेला यांच्या मालकीच्या गायीला ठार केले.गायीला ठार केल्यावर रखवालदार सखाराम बारेला यांना समजल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यावर बिबट्याने काढता पाय घेतला.
त्यानंतर संबंधित शेतकर्यांनी चोपडा वनक्षेत्रपाल बी.के.थोरात यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला.त्यावेळी सातपुड्यात गस्तीवर असलेल्या वनक्षेत्रपाल बी.के.थोरात, वनपाल जयप्रकाश सुर्यवंशी वनरक्षक अमोल पाटील,शुभम पाटील, प्रकाश पाटील , गोविंदा चौधरी यांनी गणपूर शिवारात रात्री ११ वाजून ४०मिनीटांनी जाऊन सदर घटनेची माहिती घेतली.व वनक्षेत्रपाल बी.के.थोरात यांनी शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले व ज्या ज्या भागात बिबट्या अस्तित्व आढळेल त्या भागात कॅमेरे लावण्याचे आदेश वनपाल व वनरक्षकांना दिलेत तसेच वन्यजीवांपासुन स्वतःचे व पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर दि.१८ रोजी लासुर राऊंड मधील प्रत्येक गावात जाऊन वनपाल, वनरक्षक व वन मजूर यांनी वन्यप्राणी व मानवी संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती केली.
सदर वन्यप्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून शेतकरी व शेतमजूर यांच्यातील भीतीचे वातावरण दूर करावे अशी मागणी चुंचाळे,कर्जाने, क्रुष्णापूर, चौगाव,लासुर, गणपूर,मराठे व गलंगी या भागातून होत आहे.