लोकशाही संपादकीय लेख

भुसावळ शहरालगत तापी नदी भरून वाहत असताना भुसावळकरांना तीव्र पाणीटंचाई भासत आहे. गेल्या वीस दिवसांपासून भुसावळ शहरातील पाणी जे काही कमी प्रमाणात मिळते, ते अत्यंत दूषित, किडेयुक्त प्रकारचे असते. पिण्यायोग्य पाणी नसते. म्हणून रिपब्लिक सेनेच्या वतीने आज भुसावळ पालिकेवर मडके मोर्चा घेऊन ते मडके नगरपालिकेच्या निषेधार्थ फोडण्यात आले. मडके फोडण्याचा हा एक इशारा असून, भुसावळ शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा रिपब्लिक सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. भुसावळ शहरात आजच पाणीपुरवठा होत नसून, गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून भुसावळकरांना आठवड्यातून एकदा नळाला पाणी दिले जाते. उन्हाळ्यात तर दर पंधरा दिवसाआड नळाला पाणी येते. ते सुद्धा अशुद्ध पाणी असते. खरे म्हणजे, भुसावळलगत तापी नदी वाहत असताना “कोरड घशाला आणि पाणी उशाला” अशा प्रकारची अवस्था भुसावळकरांची झाली आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून भुसावळ शहरात नगरपालिकेत भाजपची सत्ता होती आणि तीन वर्षे प्रशासकीय राजवटीत नगरपालिकेचा कारभार चालला. असताना सत्ताधारी भाजप काय करत होते? भाजपचे संजय सावकारे मध्यंतरी मंत्री होते आणि आताही ते मंत्री आहेत. भुसावळतील अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या दहा वर्षांपासून का रखडले गेले आहे, हे कळत नाही. सत्ता त्यांचीच होती. विरोधक नावालाही शिल्लक नव्हते. तरी अमृत योजना का रखडली, हे कळत नाही. आता गेल्या सहा महिन्यांपासून भुसावळ पालिकेत लोकनियुक्त सरकार आले आहे. पहिल्या चार महिन्यांत गायत्री भंगाळे या नगराध्यक्ष होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांना काम करू दिले नाही. सत्तेच्या जोरावर एकही विषय त्यांचा मंजूर होऊ दिला नाही. आता स्वतःही काही केले नाही. त्यानंतर चार महिन्यांत गायत्री भंगाळे यांची सत्ता गेली. त्यांच्या जातप्रमाणपत्रामुळे त्या सत्तेतून दूर गेल्या. आता प्रभारी नगराध्यक्ष असून, त्यांच्या माध्यमातून काम चालले आहे. मंत्री संजय सावकारे काय करतात, देव जाणे. भुसावळकरांना ८-८ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. जे मिळते ते अशुद्ध पाणी असते. तेव्हा एकतर अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले पाहिजे. पण ते होत नाही. त्यातील काय अडसर आहे, हे मंत्री महोदयांनी दूर करायला हवे आणि हा प्रश्न युद्धपातळीवरूनच सोडवला पाहिजे. पण ते काही केल्या होत नाही.
आता दोन महिन्यांपासून नगरपालिकेत त्यांच्याच पक्षाचा प्रभारी नगराध्यक्ष आहे. तेव्हा ज्या काही जीवनावश्यक बाबी आहेत, त्या तरी सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. पण तोदेखील होत नाही. पाणी नियमित देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पण ते होत नाहीत. कारण, एका वॉर्डात जास्त वेळ पाणी, तर दुसऱ्या वॉर्डात अत्यंत कमी वेळ पाणी मिळते. त्याचबरोबर काही वॉर्डांत तर अत्यंत कमी वेळ पाणी मिळते आणि जे मिळते ते देखील शुद्ध नसते. एखाद्या खेडेगावाचा पाणीप्रश्न युद्धपातळीवरून सोडवला जातो. पण भुसावळसारख्या दीड-दोन लाख वस्तीच्या शहराचा प्रश्न ही मंडळी युद्धपातळीवर सोडवू शकत नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बाजूला वरणगावात नगरपालिका आहे. तेथे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणण्यात तेथील नगराध्यक्ष सुनील काळे यांनी बाजी मारली आहे. पण भुसावळमध्ये अमृत पाणीपुरवठा योजना रखडली, म्हणून त्या नावाने खडे फोडले जात आहेत. मंत्री काय कामाचे, जे शहराला पाणी देऊ शकत नाहीत?
मध्यंतरी भुसावळ शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्नही गाजला होता. एक कुत्रा मारण्यासाठी दीड हजार रुपये खर्च करण्यात आले. पण मोकाट कुत्रे काही केल्या कमी झाले नाहीत. उलट मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच गेली. अशा प्रकारे कुत्रे मारण्याचा अजब प्रकार भुसावळ नगरपालिकेत दिसून आला. त्यानंतर कचरा साफ करण्यासाठी नियमित ज्या घंटागाड्या आहेत, त्यांच्यात अनियमितता आली होती. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर उभा राहिला होता. पण विरोधकांच्या ओरडण्यामुळे पुन्हा घंटागाड्या नियमितपणे सुरू झाल्या आहेत. पिण्याचे पाणी योग्य आणि विजेचा प्रश्न जर नगरपालिका सोडविण्यात यशस्वी होत नसेल, तर ती नगरपालिका काय कामाची? त्यामुळे पालिकेवर कोणाचा अंकुश आहे, हे तरी सिद्ध झाले पाहिजे.
भुसावळच्या पाण्याचा प्रश्न युद्धपातळीवर येऊन सोडवायचा असेल, तर त्यासाठी विद्यमान अमृत योजनेचे रखडलेले काम युद्धपातळीवरून झाले पाहिजे. हे काम मंत्री संजय सावकारे करू शकतात. मात्र ते करत नसतील, तर ते काहीच नाहीत, हे त्यांनी स्वतःहून जाहीर करायला हवे. नाहीतर असे मडके मोर्चे, हंडा मोर्चे भुसावळ पालिकेवर येतच राहणार. आता तर रिपब्लिक पक्षाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, काही दिवसांत भुसावळचा पाणीप्रश्न सुटला नाही, तर अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल. मंत्री संजय सावकारे यांच्या तोंडाला काळे फासले गेले, तर काय इज्जत राहील? त्यामुळे अमृत योजना पूर्ण होईपर्यंत तात्पुरती पाणीपुरवठा योजना भुसावळकरांना दिली पाहिजे. बरे, पाणी नाही असे म्हणायला जागा नाही. भुसावळलगत तापी नदी दुथडी भरून वाहते आहे. तेव्हा त्यातून तात्पुरती योजना युद्धपातळीवर सुरू करता येऊ शकते आणि ते पाणी भुसावळकरांना देता येऊ शकते. पावसाळ्यात जर हे काम होत नसेल, तर उन्हाळ्यात होणे शक्य नाही. पाण्याशिवाय जीवन नाही. म्हणून भुसावळकरांना युद्धपातळीवरून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.


