जळगाव-भुसावळ मार्गावर भीषण अपघातात न्यायालयीन कर्मचाऱ्याचा मृत्यू
दोघे गंभीर जखमी ; नशिराबाद ते तरसोद फाट्याजवळील घटना
जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
नशिराबाद ते तरसोद फाट्यादरम्यान हॉटेल सावनसमोर मंगळवारी (१ एप्रिल) रात्री १० वाजता दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बोदवड न्यायालयातील वरिष्ठ लिपिक योगेश बळीराम पाटील (वय ५१, रा. चैतन्य नगर, जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
योगेश पाटील हे बोदवड न्यायालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते आणि ते रोज जळगाव-बोदवड असा प्रवास करत असत. मंगळवारी रात्री १० वाजता बोदवडहून जळगावला परतत असताना, नशिराबादजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पाटील रस्त्यावर जोरात फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. तसेच, समोरील दुचाकीवरील भुसावळ येथील मुस्तफा लतिफ खान (वय ६५) आणि बी.डी. फर्नांडिस (वय ६१) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान योगेश पाटील यांचा मृत्यू झाला.
योगेश पाटील यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी लघु पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या अकस्मात निधनामुळे न्यायालयीन वर्तुळासह जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.