लोकशाही संपादकीय लेख
भुसावळ शहरात नवीन लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांच्या नेतृत्वात नगरपालिका अस्तित्वात आली, परंतु भुसावळ पालिकेत भाजपचे 27 नगरसेवक आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन असे मिळून एकूण महायुतीचे 31 नगरसेवक असून पन्नास नगरसेवकांच्या नगरपालिकेत 12 नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तर तीन काँग्रेसचे आणि बाकीच्या नगरसेवक अपक्ष आहेत. येथे सुरुवातीपासूनच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलेच जिंकले आहे. 3 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेची सभा झाली. या सभेत एकूण 250 विषय विषय पत्रिकेवर होते. त्यापैकी 170 विषयांना विरोधकांनी विरोध दर्शवला, परंतु तो विरोध नगराध्यक्षांनी आपल्या अखत्यारीत फेटाळून लावला. त्यानंतर विरोधकांनी 170 विषयांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. अशा पद्धतीने विषय मंजुरीचा प्रश्न ताटकळत पडला. त्यानंतर स्थायी समितीच्या सभा न होताच तहकूब करण्यात आली. म्हणजे भाजपचे नगरसेवक आक्रमक असून ते कुठलेही तडजोड करायला तयार नाहीत.
मुख्य प्रश्न आहे भुसावळ शहरातील पिण्याच्या पाण्याचा. गेल्या नऊ वर्षापासून अमृत पाणीपुरवठा योजनेला सुरुवात झालेली आहे. पहिल्या योजनेमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात जॅकवेल तसेच जलशुद्धीकरण व पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून टाकीचे काम सुरू असलेले अचानक चार-पाच दिवसांपासून बंद पडले आहे. हे टाकीचे काम का बंद पडले? याचा जाब विचारण्यासाठी महायुतीचे नगरसेवक गेले असता मुख्य अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, नवीन नगराध्यक्षांनी काम बंद करायला सांगितले आहे. त्यावरून महायुतीचे नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. म्हणजे नवीन नगराध्यक्ष अल्पमतात असल्यामुळे भुसावळ नगरपालिकेची पहिली सभा झाली, त्या सभेतील 250 पैकी 170 विषयांना विरोध दर्शवला. पुढे स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली.
हे सर्व होत आहे ते केवळ नगरपालिकेत संख्याबळ आहे म्हणून. परंतु या सर्व गदारोळात भुसावळ शहरवासीयांना जे गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे, त्या पाणी प्रश्नाला सोडवण्यासंदर्भात विचार होणे महत्त्वाचे आहे. भुसावळकरांना जवळ तापी नदी असताना गेल्या अनेक वर्षापासून पिण्याचे पाणी हे सात ते आठ दिवसांनी मिळते, ते सुद्धा अशुद्ध पाणी मिळते. यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. मध्यंतरी पाच वर्ष भाजपची भुसावळ पालिकेत सत्ता होती. त्यानंतर चार वर्षे प्रशासक नेमला गेला. प्रशासकीय कारकीर्दीत काही कामे व्हायला पाहिजे होती, परंतु अमृत योजनेला काही कारणास्तव विलंब झाला. त्यामुळे नऊ वर्ष उलटली तरी अमृत योजना सुरू झाली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यासाठी किमान पिण्याच्या पाण्यासंदर्भात तरी भांडाभांडी न करता एकमताने पाणी प्रश्न सोडवला पाहिजे. अन्यथा भुसावळकरांना आणखी पाच वर्षे अमृत योजनेचे पाणी मिळणार नाही.
भुसावळ नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे निवडून आल्या. त्यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी पल्लवी सावकारे यांचा पराभव करून विजय प्राप्त केला. परंतु भाजपचे 27 नगरसेवक आणि शिवसेना दोन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन नगरसेवक असे एकूण 31 नगरसेवक मिळून त्यांची सत्ता नगरपालिकेत आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 14 काँग्रेसचे तीन आणि अपक्ष चार असे एकूण बलाबल असल्याने नगराध्यक्ष गायत्री भंगाळे या अल्पमतात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक विषयात सत्ताधारी बलाबल भाजपचे असल्याने विषय मंजुरी बाबत अडचणी येथे आहे. त्यातच भुसावळ मध्ये माजी आमदार संतोष चौधरी हे स्वीकृत सदस्य झाल्याने सगळा कारभार नगराध्यक्षाच्या वतीने तेच चालवितात, असा समज विरोधी नगरसेवकांचा झाला आहे. नगराध्यक्षाला लिहून दिलेली स्क्रिप्ट फक्त वाचली जाते. त्यामुळे सर्व 31 नगरसेवक चिडलेले आहेत. त्यातच संतोष चौधरी हे दमदाटी करतात असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कुठलेही बेकायदेशीरपणे कारभार आम्ही चालू देणार नाही.
नगराध्यक्ष गायत्री भंगाळे या कुठल्याही समाजाच्या असल्या तरी एक महिला नगराध्यक्ष म्हणून आम्ही त्यांचा आदरच करतो, असे गटनेते युवराज लोणारी यांनी म्हटले आहे. योग्य कामाला आम्ही साथ देऊ मात्र बेकायदा कामाला लगाम लावण्याची ताकद आमच्यात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासारख्या प्रश्नासाठी आता राजकारण कोणी करू नये. पिण्याचे पाणी भुसावळकरांना मिळालेच पाहिजे, ही आमची मनापासूनची इच्छा आहे. त्यासाठी कुणी कुणाला धमकी देण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आम्ही भीक घालणार नाही, हे संतोष चौधरी यांचे नाव न घेता युवराज लोणारी यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे भुसावळकरांच्या पिण्याच्या पाण्याचा पाण्याबाबत कोणी राजकारण करू नये..!

