सोशल मिडियातून नैराश्याचा नव्हे तर समृद्धीचा मार्ग शोधा – उज्ज्वला बागुल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ; सतत सोशल मीडियाच्या वापरामुळे आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असून मानसिक ताण वाढत आहे. एकत्र असूनही एकटेपणाचा अनुभव येत असल्याने नैराश्य वाढत आहे. वास्तविक पाहता नातेसंबंध टिकविण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना केवळ मेसेज फॉरवर्ड न करता क्षणभर थांबून परिणामांचा विचार करून नंतरच पोस्ट टाकायला हवी. सोशल मिडियातून नैराश्याचा नव्हे तर समृद्धीचा मार्ग शोधायला हवा, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन उज्ज्वला बागुल यांनी केले.

भुसावळ येथील श्री दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर राजोरे (ता. यावल) येथे दि. 8 ते 14 मार्चदरम्यान सुरू आहे. शिबीरातील बौद्धिक व्याख्यानांतर्गत ‘सोशल मिडिया आणि युवक’ या विषयावर उज्ज्वला बागुल यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी प्रा.डॉ. दयाधन राणे, प्रा.डॉ. जी. पी. वाघुळदे, प्रा. निर्मला वानखेडे उपस्थित होते.

रासेयो स्वयंसेवक विजय चौधरी याने स्वागत केले. व्याख्याता उज्ज्वला बागुल आपल्या मनोगतात म्हणाल्या की, सोशल मीडियावरील शाब्दिक खेळांमुळे संशयांचे, उपेक्षेचे नाते निर्माण होऊ लागले आहे. अविश्वास, अस्वस्थता, असुरक्षिता वाढू लागली आहे. रात्री उशिरापर्यंत चॅटिंग, अपुरी झोप, चिडचिड यामुळे मानसिक स्वास्थावर परिणाम होत आहे.

कौटुंबिक सौख्यावर, नातेसंबंधावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या आधीन न होता संयमाने परिणामांचा विचार करून त्याचा वापर केला तर त्यातील आनंद नक्की मिळेल. माहितीच्या आभासी दुनियेत न वावरता मर्यादित, गरजेपुरता वापर सोशल मीडियाचा केला पाहिजे. सोशल मीडियाच्या वापरावर मर्यादा हवी.

त्याचे भान ठेवावे. आपले खासगी आयुष्य सामजिक होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील व्याख्याता उज्ज्वला बागुल यांनी केले. सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक प्रशिक तायडे याने तर आभार यश चौधरी याने मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.