तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर १९ दिवसांनंतर गुन्हा दाखल

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील रामेश्वरी रविंद्र नागपुरे या २४ वर्षीय तरुणीने भावी पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास घेऊन २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. दरम्यान पोलिसांकडून दोषींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होता. अखेर १२ एप्रिल रोजी १९ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीचे निवेदन तरुणींच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी, विविध सामाजिक संघटनांनी, गावातील महिलांनी पुढाकार घेऊन भुसावळ तसेच जळगाव येथील पोलीस ठाण्यात, कार्यालयात, पोलीस अधीक्षक, पालकमंत्री, महिला आयोगाकडे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले होते.

तसेच मुलीचे वडिल रविंद्र नागपुरे यांनी मंत्रालयात व मुख्यमंत्री यांना ऑनलाइन तक्रार केली होती. याची दखल घेत शेवटी १९ दिवसांनी १२ एप्रिल रोजी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भावी नवरदेव भुषण पाटील (बारी) याच्यावर भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर लगाम लागून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत असा सुर गावातून उमटत आहे.

अखेर प्रयत्नांना यश मिळाले: रविंद्र नागपुरे

माझ्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन आम्ही दिले होते. यात विविध ज्येष्ठ मंडळींनी तसेच सामाजिक कार्यकर्ते, गावातील विविध समाजातील महिलांनी – लोकांनी मदत केली. गुन्हा दाखल होण्यास विलंब जरी झाला तरी तो दाखल झालेला आहे. गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळाल्यास माझ्या मुलीच्या आत्म्यास शांती मिळेल व अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर लगाम लागून भविष्यात अशा घटना घडणार नाही. अशी प्रतिक्रिया मयत तरुणीच्या वडिलांनी दिली आहे.

भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील मुलगी रामेश्वरी रवींद्र नागपुरे (वय २४) हीचा साखरपुडा ६ मार्च रोजी भूषण ज्ञानेश्वर पाटील (बारी) राहणार रावेत, ह. मु. नाशिक यांच्याशी झाला होता. दरम्यान भावी नवरा मुलगा भूषण यानी वेळोवेळी रामेश्वरी हिला फोन करून “मानसिक त्रास देत होता. तसेच हुंडा वाढवून देणे, तू आडानी आहेस, तू जाड आहेस, तू मला नापसंत आहे, मी लग्न मोडणार” अशी दमदाटी व धमक्या देत होता एवढ्यावरच न थांबता मुलीच्या वडिलांना रावेर येथे बोलावून दहा ग्रॅमची अंगठी काढून घेतल्या आणि कुणाला सांगू नकोस असे सांगून दम दिला. लग्नात बग्गी पाहिजे, एसी पाहिजे, लग्न कुऱ्हे पानाचे येथे न ठेवता भुसावळ येथे हॉल मध्ये हवे अशा अवाजवी मागण्या वाढत गेल्याने छळाला कंटाळून रामेश्वरी या तरुणीने २५ मार्च रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.