भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील तापी नदीवर मोठा पूल असून त्या पुलावर दोन ते तीन फुटाचे कठडे लावण्यात आलेले आहे. या पुलावर प्रचंड रहदारी असते तसेच या पुलावर मॉर्निंग वॉकसाठी व शतपावली करण्यासाठी अबाल-वृद्ध या पुलावर फिरत असतात. येथे अनुचित प्रकार घडू नये यासाठी संरक्षक जाळ्यांच्या प्रस्तावाला त्वरीत मंजूरी द्यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी दिला आहे.
या पुलावरील कठड्यांजवळ युवक-युवती, नागरिक कित्येक वेळा एक एक दोन दोन तास एकाच ठिकाणी उभे राहून गप्पा मारताना, हिंडताना दिसतात तसेच सेल्फी सुद्धा काढतात. या पुलावरील या लहानशा कठड्यांमुळे अनेकांनी तापी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच एका महिलेने इसमाने उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे तापी नदीवर संरक्षक जाळ्या नसल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. बऱ्याचदा या पुलावर अपघात सुद्धा होतात. त्यातल्या त्यात नुकतीच आता शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यामुळे त्याचा बॅकवॉटरमुळे तापी नदीत पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे अनेकदा आत्महत्या करणाऱ्यांना उडी मारणाऱ्यांना जीव वाचवण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणून तापी नदीवरील पुलावरून आत्महत्या रोखण्यासाठी त्वरित युद्ध पातळीवर तापी नदीच्या पुलावरील दोघ बाजूंच्या कठड्यांजवळ किमान बारा फूट उंचीचे सुरक्षा जाळ्या उभाराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंसदर्भात सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित सर्व कार्यालयांना हे निवेदन गेल्या तीन महिन्यांपासून पाठवलेल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तापी नदीवरील दोन्ही बाजूकडील बारा फुटाच्या संरक्षक जाळ्याचा अंदाजपत्रकाचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर शासनाकडे पाठविण्यात आल्याचे कळविले आहे. मात्र त्यावर अद्यापही कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
… अन्यथा उपोषण!
गेल्या तीन महिन्यांपासून संरक्षक जाळ्या बसविण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पडून असून त्यावर त्वरीत निर्णय घ्यावा अन्यथा उपोषण करण्यात येर्इल असा इशारा शिशिर जावळे यांनी दिला आहे.