शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील शैक्षणिक संस्था परिसरातील पान टपरी व दुकानें यांच्यात तंबाखूयुक्त पदार्थ, सिगारेट इ विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. गुरुवारी दुपारी 4 नंतर अशा शाळांच्या परिसरातील पान टपऱ्या, दुकानें यांची अचानक झडती घेण्यात आली व ज्या दुकानामध्ये असे तंबाखू / सिगारेट मिळून आले त्यांच्यावर सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध, व्यापार, वाणिज्य उत्पादन, पुरवठा व वितरण विनियमन) अधिनियम 2003 च्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

शाळांच्या 100 मीटरच्या आत गुटखा, तंंबाखुजन्य पदार्थ विक्री करणार्‍या तीन विक्रेत्यांविरूध्द बाजारपेठ पोलिसात तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दित दोन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी 17 हजार 572 रूपयांचा गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ पाचही विक्रेत्यांकडून गुटखा जप्त केला. पाचही विक्रेत्याविरूध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे बंदी असलेला गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस स्टेशन निहाय बाजारपेठ 2, भुसावळ शहर 2, भुसावळ तालुका 1, नशिराबाद 2 अशाप्रकारे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यात नाहाटा चौफुली जवळ शेखर राजेद्र वाणी यांच्याकडे 5 हजार 449 रूपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अतुल कुमावत या पोलिस कर्मचार्‍यांने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

शडरातील मामाजी टॉकीज रोडवरील घासीलाल वडेवाल्याच्या बाजूला तुलसीदास मार्केटमधील ओमसाई ट्रेडर्स येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे कारवाई करीत 8 हजार 600 रूपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी 5.15 वाजता केली आहे. तसेच
शहरातील जामनेर रोडवरील मुन्सीपल हायस्कूलजवळ मामा पान कॉर्नर येथे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कारवाई करीत तेथून 2 हजार 873 रूपयांचा गुटखा जप्त केला.

याप्रकरणी लिलाधर भारंबे यांच्या विरूध्द पोलिस कर्मचारी योगेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिन्ही कारवाईत 16 हजार 922 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर
शहर पोलिसांनी सेंट अलॉयसीस शाळेपासून 50 मीटर अंतरावर एका विक्रेत्याकडून 350 रूपयांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केला. शहर पोलिस ठाण्यातील जाकीर मन्सु्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल चुडामण भोई (रा. झेडटीएस, भुसावळ) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तर हारून मन्सुरी यांनी पुन्हा याच परिसरात कारवाई केली आहे.

यात रूपेश हुसळे यांच्याकडील 300 रूपयांचा गुटखा व अन्य पुड्या जप्त केल्या आहे. त्यांच्या विरध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार मोहंमद अली सैय्यद हे पुढील तपास करीत आहे. तंबाखू युक्त पदार्थ शैक्षणिक परिसरामध्ये विक्री केल्याने विद्यार्थी नकळत त्या पदार्थांकडे वाढतात आणि त्यातून व्यसनी होतात. यास प्रतिबंध व्हावा म्हणून सदरचा कायदा करण्यात आलेला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, राहुल गायकवाड़, गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीच्या पोलिस कर्मचार्‍यांनी शहरातील विविध शाळांच्या बाहेर उभ्या राहात असलेल्या गुटखा, तंबाखु, सुगंधी सुपारी यांच्या विरूध्द विशेष मोहिम राबवित गुटखा मोठ्या प्रमाणावर जप्त करीत सदरची कारवाई करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.