भुसावळ : रेल्वे प्रशासनाने मंगळवारी रेल्वेतील फुकट्या प्रवाशांसह अनधिकृत विक्रेत्यांविरोधात भुसावळ रेल्वे विभागात धडक मोहिम राबवल्याने खळबळ उडाली आहे. यात ५५१ केसेसच्या माध्यमातून सुमारे ४ लाख रुपयांचा दंड या वेळी वसूल करण्यात आला.
भुसावळ विभागाने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मंगळवारी डीआरएम ईती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबवली. ही व्यापक मोहीम पार
पाडण्यासाठी वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. १४ मे रोजी भुसावळ, खंडवा, बडनेरा, अकोला, मनमाड, नाशिक रोड स्टेशनवर अनधिकृत फेरीवाले (विक्रेते) यांच्याविरोधात ही मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये ३५ आरपीएफ अधिकारी आणि कर्मचारी व ५२ वाणिज्य विभागाचे कर्मचारी (वाणिज्य निरीक्षक आणि टीटीई) सहभागी झाले होते. यात ३२ अनधिकृत
विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तर ४५७ विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर केसेस करण्यात आल्यात. तर रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छता करणाऱ्या ४९ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच धुम्रपान करणाऱ्या १० जणांवर आणि रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या ३ जणांवर कारवाई करण्यात आली. अशा एकूण ५५१ केसेसच्या माध्यमातून ३ लाख ९९ हजार ६६३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.