जागतिक कवितादिनी रंगली काव्यसंध्या आणि उभारली ग्रंथगुढी

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

डी.एस. हायस्कूल शेजारील सार्वजनिक वाचनालयात जागतिक कवितादिनाचे औचित्य साधून निमंत्रित कवींची काव्यसंध्या रंगली. सोबतच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येचे निमित्त साधून विविध प्रकारच्या ग्रंथांची गुढी उभारण्यात येऊन ग्रंथ गुढीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी डॉ. मिलींद धांडे तर प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक तथा प्रकाशक काशिनाथ भारंबे, ज्येष्ठ कवयित्री ललिता टोके, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, कवयित्री जयश्री काळवीट, शिक्षक कवी गणेश जावळे, शिक्षक कवयित्री संध्या भोळे, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर, सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे, संचालक हरीश पाटील, सेवक होनाजी चौधरी, मोबीन पटेल यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ग्रंथ गुढी उभारण्यात येऊन पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात जयश्री काळवीट यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतू सांगून कवितादिनाचे महत्त्व विशद केले. साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल काशिनाथ भारंबे यांना मध्यप्रदेशात झालेल्या समारंभात सारस्वत सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने ग्रंथपाल नितीन तोडकर व कवयित्री जयश्री काळवीट यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. मिलिंद धांडे यांनी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असलेले कवितेचे महत्त्व सांगितले आणि मानसिक आधार व आनंद देण्याचे काम कविता करत असल्याचेही ते म्हणाले. सूत्रसंचालन कवयित्री संध्या भोळे यांनी तर आभार सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.