चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला तीन वेळा फाशीची शिक्षा
भोपाळ न्यायालयाचा निकाल ; मदत करणाऱ्या आई आणि बहिणीला दोन वर्षांचा कारावास
भोपाळ – ५ वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस भोपाळ न्यायालयाने तीन वेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, पुरावे नष्ट करण्यास मदत करणाऱ्या त्याच्या आई आणि बहिणीला प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निर्णय नव्या भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत दिलेला पहिला मोठा निकाल मानला जात आहे.
या प्रकरणात आरोपीला तीन वेगवेगळ्या कलमांखाली मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच, दोन कलमांतर्गत जन्मठेप आणि आणखी दोन कलमांतर्गत ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीचे नाव अतुल निहाले असून, ही घटना २४ सप्टेंबर २०२४ रोजी शाहजहांबाद येथे घडली होती. मुलीच्या गुप्तांगासह संपूर्ण शरीरावर चाकूचे वार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीच्या आई आणि बहिणीने मदत केली होती.
फास्ट ट्रॅक न्याय व निकाल:
विशेष न्यायाधीश कुमुदिनी पटेल यांनी हा ऐतिहासिक निकाल सहा महिन्यांच्या आत दिला. “हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आहे. जर आपण मुलांना असा सुरक्षित समाज देऊ शकत नसेल जिथे ते मुक्तपणे खेळू शकतील, तर सुसंस्कृत समाजाची कल्पना कशी करता येईल?” असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायाधीशांनी आरोपीला अत्यंत क्रूर, निर्दयी व भयानक संबोधून मृत्युदंडाशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, असे नमूद केले.
अत्याचार व हत्या कशी उघड झाली?
हत्या केल्यानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह गोणीत भरून बाथरूमच्या टाकीत लपविला होता. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर शोधमोहीम राबवून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. न्यायालयात आरोपीने मानसिक आजार असल्याचा दावा केला. मात्र, सरकारी वकिलांनी तो गुन्ह्याच्या वेळी पूर्णपणे शुद्धीत असल्याचे सिद्ध करून हा गुन्हा नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे स्पष्ट केले.
हा निकाल अत्याचार पीडितांसाठी न्याय देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आरोपीला दिलेली तिहेरी फाशीची शिक्षा भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एक मोठा इशारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.