लोकशाही संपादकीय लेख
चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तापी नदीवरील जळगाव तालुका आणि चोपडा तालुक्याला जोडणारा भोकर पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. साडेसहाशे मीटर लांबीचा हा 1600 कोटी रुपये खर्च असलेला पूल एक वर्षात पूर्ण होईल, असे उद्घाटनाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने निधी देण्यात आला. सुमारे 80 कोटी रुपये आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे निधी देण्यात आला आहे. परंतु त्यानंतर बांधकाम खात्यातर्फे निधी मिळालाच नाही. सार्वजनिक बांधकाम खाते व जलसंपदा खाते मिळून दोघांनी निधी द्यायचा होता. परंतु जलसंपदा खात्यातून फक्त 15 कोटी रुपये निधी मिळाला असून त्यानंतर जलसंपदा खात्याकडून एक दमडी देखील निधी मिळालेला नाही. चार वर्षात एकूण पुलाचे काम 65 ते 70% झाल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. सध्या निधी अभावी काम रखडले असून अत्यंत कासव गतीने ते काम चालू आहे. चोपडा आणि जळगाव तालुक्याला जोडणाऱ्या या पुलामुळे धुळे जिल्ह्याला तसेच मध्य प्रदेशातही वाहतुकीसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे. जळगावहून चोपडाचे अंतर एकदम 30 किलोमीटरने कमी होणार आहे. आता इदगाव, धानोरा मार्गे चोपड्याला जायचे म्हटले तर 60 किलोमीटर इतके अंतर येते.
या पुलामुळे केळीच्या वाहतुकीला देखील फार मोठा फायदा होणार आहे. चोपड्याहून केळीची वाहतूक जळगावला करायची म्हटली तर केळीच्या वाहतुकीचा खर्च वाढतो. पर्यायाने वाहतूक खर्च वाढला की भाव वाढीवर फरक पडतो. हे ओघाने आलेच चोपड्याची केळी मध्य प्रदेशातील बराणपुरला न्यायची झाली तर या पुलामुळे वाहतूक खर्च कमी येईल आणि केळीची वाहतूक मध्य प्रदेशात लवकर होईल. तेच धुळे जिल्ह्यात वाहतुकीबाबत होऊ शकते. जळगावहून धुळे जिल्ह्यात केळीची वाहतूक करायची झाली तर त्याला वाहतूक खर्च कमी येतो. तसेच चोपड्यातून धुळ्याला केळी न्यायची असेल तर त्याचा वाहतूक खर्च कमी येतो. अशा प्रकारे सर्व सोयींनी युक्त हा तापीवरील भोकर पूल, भोकर आणि भाकरवाडी गावाला जोडणारा हा पूल होणे अत्यंत महत्त्वाचा असून सर्वच वाहतुकींसाठी तो फायद्याचा ठरणार आहे. खाजगी वाहतूक या सर्व दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. अशा पुलाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडले. 1600 रूप कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पाचे काम एका वर्षात होईल, असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात त्या पुलाच्या कामाला ब्रेक लागला आहे. एक वर्षभर जोरात काम सुरू झाले पण त्यानंतर त्या पुलाचे काम थंड पडले. अत्यंत धीम्या गतीने किंवा काहीच काम होत नाही, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने आतापर्यंत 80 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यानंतर त्याच्या निधीत मर्यादा आल्या आणि त्यांची निधी सुद्धा बंद पडला. सार्वजनिक बांधकाम खात्याजवळ निधी उपलब्ध नाही, असे सांगण्यात येते. तसेच जलसंपदा खात्यातून एकूण 15 कोटी रुपये निधी मिळाला आहे. या खात्याकडून निधी मिळायलाच हवा पण तो मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. जलसंपदा खात्यातर्फे निधी का मिळत नाही? ही बाब जलसंपदा खात्याचे मंत्री गिरीश महाजन हेच सांगू शकतील.
तापी नदीवरील भोकर पूल जळगाव तालुक्याला जोडणारा आणि चोपडा तालुक्याला जोडणारा पूल आहे. जळगाव तालुका म्हणजे जळगाव ग्रामीण मतदार संघ येतो आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा तो मतदार संघ आहे. तिकडे भोकर पूल चोपडा तालुक्यात जोडला म्हणजे चोपडा विधानसभा मतदारसंघाला जोडणे होय. चोपडा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा आहे. हा पूल झाला तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शिवसेनेचे आणि चंद्रकांत सोनवणे हे सुद्धा शिवसेनेचे आमदार आहेत. त्या दोघांना या पुलाचे श्रेय जाईल अशा प्रकारे एक समज निर्माण झाला आहे. त्यासाठी जलसंपदा खात्यातर्फे निधी दिला जात नाही काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. त्या श्रेय वादाच्या लढाईत थकलेला पूल मागे पडला असून त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. परंतु विकासाच्या दृष्टीने विचार केला तर श्रेयवाद सोडून हा पूल झाला पाहिजे असे प्रत्येकालाच वाटते. जिल्ह्याला तीन मंत्री आहेत. तेव्हा मंत्र्यांनी मनावर घेतले तर त्याला निधी उपलब्ध होणे काही अशक्य नाही. विकासाचा निधी इतर कामांवर वापरण्याऐवजी तो विकासावर वापरला तर योग्य होईल. पालकमंत्री गुलाबराव पाटील हतबल आहेत. कुठून निधी कसा आणायचा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही. दुसरे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा खात्याचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होती. परंतु गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असून ते त्यांच्या पालकमंत्री पदात व्यस्त आहेत. आगामी कुंभमेळा यशस्वी करण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना एवढे बघायला वेळ नाही. तिसरे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे असून ते जिल्ह्यात आहेत की नाही? या दृष्टीने वागतात. राहिले चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे. यांचे किती वजन पडते हे दिसून येतेच आहे..!

