संक्रांती : भोगीची भाजी

0

 

मकर संक्रांत विशेष खाद्य रेसिपी 

भोगीची भाजी ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी आहे, जी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनविली जाते…

घटक

  • २ चमचे उकडलेले शेंगदाणे
  • २ चमचे सफेद तीळ
  • २ चमचे किसलेले सुके खोबरे
  • फोडणीसाठी तेल
  • १/२ चमचा जीरे
  • १ चमचा गोडा मसाला
  • पाव चमचा धणा पावडर
  • दीड चमचा लाल मिरची पावडर
  • १ बटाटा
  • १ छोटी वाटी मटार
  • पाव कप ओला हरभरा
  • पाव कप वाल पापडी
  • पाव कप तुरिचे दाणे
  • १ गाजर तुकडे करून
  • २ छोटी वांगी
  • गुळ
  • चिंचेचा कोळ
  • मीठ

 

कृती

सर्व भाज्या धुवून तुकडे करून घ्या. पॅनमध्ये शेंगदाणे, तीळ आणि सुके खोबरे गुलाबी रंगावर वेगवेगळे भाजून घ्या. आणि गार झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या. शेंगदाणे कुकरमध्ये उकडून घ्या..

आता फोडणीसाठी तेल तापवून त्यात जिरे हिंग घाला. जिरं मस्त तडतडल्यावर त्यात तीळ, शेंगदाणे आणि सुके खोबरे याचं वाटण घालून खमंग परतून घ्या. ५ मिनिटांनी त्यात गोडा मसाला, धणा पावडर आणि लाल मिरची पावडर घालून २ ते ३ परतवत रहा. खमंग परतून झाल्यावर त्यात बटाटा, मटार, हरभरा, वाल पापडी, तुरीचे दाणे आणि गाजर घाला.

नंतर त्यात पाणी घालून भाज्या अर्ध्या शिजवून घ्या. आपण यात वांगी नंतर घालणार कारण ह्या भाजीला शिजायला वेळ कमी लागतो. एक १० मिनिटांनी वांगी, उकडलेले शेंगदाणे, मीठ, गुळ चिंचेचा कोळ आणि अजून थोडे पाणी घालून भाजी मंद आचेवर शिजू द्या..

भाजी शिजेपर्यंत उकळू द्यावी. भाजी अंगासरशी रस असला पाहिजे. हि भाजी भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर खावी. मी १ वाटी बाजरी पीठ आणि प्रत्येकी १/२कप ज्वारी व तांदूळ पीठ मिक्स करून भाकरी बनवली आहे.

सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोडगोड बोला.

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे
पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई
मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.