शेतकऱ्यांचा महानायक

0

लोकशाही संपादकीय लेख

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दहा वर्षे आधी १२ डिसेंबर १९३७ रोजी जळगाव जिल्ह्यातील वाकोद सारख्या खेडेगावात जैन समाजात जन्मलेला एक तरुण गलेलठ्ठ पगाराची प्रशासकीय नोकरी सोडून, अवघ्या सात हजारांच्या भांडवलावर व्यवसायाला सुरुवात करतो आणि जगप्रसिद्ध उद्योगपती बनतो. शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनतो. शेतकऱ्यांचा महानायक बनण्याचा बहुमान प्राप्त करतो. ते व्यक्तिमत्व म्हणजे जळगावचे जैन उद्योग समूहाचे संस्थापक कै. भवरलालजी जैन. त्यांचा आज सातवा स्मृतिदिन. जैन उद्योग समूहाच्या वतीने हा दिवस ‘श्रद्धावंदन दिन’ म्हणून पाळण्यात येतो. वयाच्या २६ व्या वर्षी १९६३ मध्ये सात हजार रुपयांच्या भांडवलावर आपला व्यवसाय सुरू केला आणि आजमितीला सात हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची संस्था बनवली.

जगातील ३१ देशांमध्ये जैन उद्योग समूहातर्फे उद्योगांमार्फत निर्मिती केली जाते. जळगावचे नाव जगाच्या नकाशावर आणण्याचे श्रेय कै. भवरलाल जैन (Bhawarlal Jain) यांना जाते. जळगाव शहरातील उद्योग व्यवसायाच्या कारभारावर नियंत्रणाचे मुख्य केंद्र मात्र जळगाव आहे, हे विशेषत्वाने नमूद करण्यासारखे आहे. मोठ्या मेट्रो सिटी मध्ये जाऊन उद्योग सुरू करण्याचा सर्वच व्यावसायिक उद्योगपतींचा कल असतो. परंतु उद्योगपती भवरलालजी जैन मात्र त्याला अपवाद आहेत. उद्योगाचे मुख्य कार्यालय मेट्रोसिटीमध्ये असले तर परदेशी उद्योगपतींना, उद्योग प्रतिनिधींना, परदेशी स्थायिक अधिकाऱ्यांना परदेशातून भारतात येणे सुलभ होते. मात्र एअरपोर्ट आणि इतर सुविधा उपलब्ध असेल, उद्योगाचे उत्पादन दर्जेदार असेल आणि त्याला देशासह परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी असेल, तर परदेशी मंडळी तुम्ही कुठेही असाल तर तेथे ते येतात.

जैन उद्योग समूहाच्या जळगाव येथील मुख्य कार्यालयात दरवर्षी किमान ६०० परदेशातील मंडळी येऊन भेटी देतात. काही मंडळी औरंगाबादला विमानाने पोहोचून तेथून ते गाडीने जळगावला येतात. काहीजण मुंबईहून मोटारीने अथवा रेल्वेने जळगाव येतात. त्यामुळे जळगाव सारख्या ग्रामीण भागात परदेशातील प्रतिनिधी येऊ शकत नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. परंतु “जळगावच्या माझे जन्म ठिकाण असलेल्या माझ्या गावात उद्योगाचे प्रमुख कार्यालय आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे ग्रामीण उद्योगाला पोषक वातावरण नसते, असा पूर्णपणे दावा करणे मला मान्य नाही.” असे भवरलालजी स्पष्टपणे सांगायचे. त्याचबरोबर शेतीवर आधारित उद्योगाला भविष्य मोठे आहे. ही काळाची गरज सुद्धा आहे. शेतकरी आणि त्याची शेती सुधारली तर देशाचे तसेच जगाचे अर्थशास्त्र बदलू शकते, हे भवरलालजींचे उद्योगा संदर्भात मूळ तत्व होते.

भारतातील शेतकऱ्यांच्या शेतीची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेल्या शेतकरीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी देशात विशेषतः महाराष्ट्रात नद्यांना अडवून त्यावर बंधारे, धरणे बांधून जलाशय निर्माण केली आहेत. त्या जलाशयातील पाणी मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी उपयोगात आणले जाते. शेतीसाठी फार कमी पाणी मिळते. निसर्गाच्या लहरीनुसार मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे शेतातील पीक उत्पादन नीटपणे होत नाही. कधी कमी पाऊस झाला म्हणून, तर कधी जास्त पाऊस झाला म्हणून शेतीतील पिकाचे नुकसान होते. आणि दुष्काळाशी मुकाबला करावा लागतो. अधून मधून हा दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला असतो. म्हणून या दुष्काळाच्या सावटातून शेतकऱ्यांची मुक्तता करायची असेल तर उपलब्ध पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करून ते उपयोगात आणावे लागेल. त्यासाठी मायक्रो इरिगेशन पद्धतीचा वापर होणे आवश्यक आहे. जैन उद्योग समूहाने ठिबक सिंचनाद्वारे पिकाला पाणी दिले, तर कमी पाण्यात भरघोस पिकाचे उत्पादन शेतकरी घेऊ शकतो. म्हणून भवरलालजी यांनी ठिबक सिंचनाचे उत्पादन सुरू केले. त्याचा उपयोग भारतातील शेतकऱ्यांबरोबर परदेशातही होऊन ठिबक सिंचन यंत्रणेची निर्यात होऊ लागली. यामुळे भारतातील ठिबक सिंचनाचे प्रणेते म्हणून जैन उद्योग समूह समूहाला विशेषतः भवरलालजी जैन यांना ओळख निर्माण झाली.

‘महात्मा गांधी हे जगातील सर्वात मोठे आणि यशस्वी उद्योगपती होते’ असे भवरलालजी यांचे म्हणणे आहे. ‘खेड्याकडे चला’ असा संदेश देणाऱ्या गांधीजींचे तत्त्वज्ञान तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी अमलात आणले असते, तर आज आपल्या देशाचा कायापालट झाला असता, असे भवरलालजी वारंवार सांगायचे. महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले कै. भवरलालजी यांची राहणी अत्यंत साधी होती. सर्वसामान्य व्यक्ती, लहान बालके, तरुण-तरुणी यांच्यात ते समरस व्हायचे. कै. भाऊ कोणालाही सहज भेटायचे. कोणतेही काम हाती घेतल्यास त्याला जिद्द, मेहनत आणि चिकाटीने पहिले स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास यश हमखास येते, असे त्यांचे म्हणणे होते. जागतिक पातळीवर उद्योग व्यवसाय करताना परदेशात खानपानात बदल करावा लागतो, असा असलेला समज कै. भाऊंनी दूर केला. परदेशात वास्तव्यास असताना उद्योगांच्या मेळाव्यातील भोजन प्रसंगी मांसाहाराची मेजवानी असताना त्यांचे समवेत शाकाहारी भोजन घेणारे कै. भवरलालजी यांनी एक आदर्श निर्माण केला. त्यामुळे मांसाहार घेतलाच पाहिजे, हा दंडक त्यांनी मोडीत काढला. जैन उद्योग समूहाच्या परिसरात आजही शुद्ध शाकाहारी भोजन मिळते. मद्यपानास पूर्णपणे बंदी आहे. मांसाहार खाणाऱ्यांसाठी शहरात पाठवले जाते.

कै. भवरलालजी जैन यांची अनेकांनी प्रेरणा घेऊन आपले उद्योग व्यवसाय प्रभावी केले आहेत. जैन उद्योग समूहाने उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंत पारितोषिके पटकविले आहेत. याची यादीत द्यायची म्हटली तर स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. कै. भवरलालजी वारंवार म्हणायचे “आयएएससाठी शेतीविषयक विषय ठेवायला हवे. कारण लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना नोकरशहाकडून योग्य मार्गदर्शन होत नाही. शेती काम करणाऱ्यांसाठी पद्मश्री किताब देण्यात यावा,” अशी मागणी सुद्धा ते करायचे. देशाच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे काळात मला पद्मश्री मिळाली. तसाच पायंडा कायम ठेवला पाहिजे, असे कै. भाऊ यांचे म्हणणे होते.

आता कै. भवरलालजींच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे सिंहावलोकन करताना त्यांचे सुपुत्र अशोक भाऊ, अनिल भाऊ, अजित भाऊ आणि अतुल भाऊ यांचे करावे तेवढे कौतुक अपुरे पडणार आहे. जैन उद्योग समूहाची घोडदौड कायम ठेवण्यास चारही भावंडांनी स्वतःला झोकून दिले आहे. कै. भाऊंच्या आदर्शावर भावी वाटचाल करून त्यांचे नाव रोशन करणे, हीच खरी त्यांना आदरांजली होय. कै. भवरलालजींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन…!

Leave A Reply

Your email address will not be published.