भगवद्गीता अध्याय १२ : भाग ७
वार्षियेविण सागरु। जैसा जळे नित्य निर्भरु।
तैसा निरुपचारु। संतोषी जो॥१५१॥
अर्जुना तो भक्तु। तोचि योगी तोचि मुक्तु।
तो वल्लभा मी कांतु। ऐसा पढिये॥१२-१५६॥
अनपेक्ष: शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ:।
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्त: स मे प्रिय:॥१६॥
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति।
शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य: स मे प्रिय:॥१७॥
जो आत्मलाभासारिखे। गोमटे काहीचि न देखे।म्हणौनि भोगविशेखें। हरिखेजेना॥१९०॥ पैं आपुले जे साचे। ते कल्पांतीही न वचे। हे जाणोनि गताचे। न शोची जो॥१९२॥ जे खरोखर आपले अबाधीत सत्य आत्मस्वरुप आहे ते कल्पांतीही नाहिसे व्हायचे नाही; असा ठाम निश्चय मनात असल्यामुळे जो गत गोष्टीचा मुळीच शोक करीत नाही। वोखटे का गोमटे। हे काहीचि तया नुमटे। रात्रिदिवस न घटे। सूर्यासी जेवी॥१९४॥ ज्याप्रमाणे सूर्याला रात्र व दिवस हा भेद मूळी माहीतच नसतो, त्याप्रमाणे आत्मस्वरुपापुढे वाईट अगर चांगले हे काहीच वाटत नाही॥ असा भक्त मला प्रिय आहे।
सम: शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो:।
शीतोष्णसुखदु:खेषु सम: संगविवर्जित:॥१८॥
पार्था जयाचिया ठायी। वैषम्याची वार्ता नाही। रिपुमित्रा दोही। सरिसा पाडु॥१९७॥ का घरिचिया उजियेडु करावा।पारखिया अंधारु पाडावा। हें नेणेचि गा पांडवा। दीपु जैसा॥१९८॥ जो खांडावया घाव घाली। कां लावणी जयाने केली। दोघां एकचि साउली। वृक्षु दे जैसा॥१९९॥ नातरी इक्षुदंडु। पाळीतया गोडु। गाळितया कडु। नोहेंचि जेवीं॥२००॥ अरिमित्री तैसा। अर्जुना जया भावो ऐसा। मानापमानी सरिसा। होतु जाय॥२०१॥ ज्याला शत्रु व मित्र समान वाटतात, मान अपमान समान वाटतात, घरच्यांना प्रकाश द्यावा व बाहेरच्यांना प्रकाश द्यायचा नाही, अंधार पाडायचा असे दिवा कधीच करीत नाही। जो झाडाला तोडण्यासाठी घाव घालतो व जो त्याला वाढवतो त्या दोघांना झाड जसे सारखीच सावली देते, त्याप्रमाणे व जो ऊसाची लगवड करतो व जो त्याला घाण्यात घालून पिळतो त्या दोघांना ऊस सारखीच गोडी देतो, भेदभाव करीत नाही, तसेच ज्याला शत्रु व मित्र समान वाटतात, असा भक्त मला आवडतो।
तुल्यनिंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येनकेनचित्।
अनिकेत: स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नर:॥१९॥
जो यथालाभे न तोखे। अलाभे न पारुखे। पाउसेविण न सुके। समुद्रु जैसा॥२१०॥ पाऊस पडला न पडला तरी समुद्र आटून सुकत नाही त्याप्रमाणे ईच्छेप्रमाणे घडले तरी संतोष नाही व न घडले तरी त्याचे दु:ख नाही॥ हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर। किंबहुना चराचर । आपण जाहला॥२१३॥ मग याहीवरी पार्था। माझ्या भजनी आस्था। तरी तयाते मी माथा मुकुट करी॥२१४॥ हे संपुर्ण विश्वच माझे घर आहे, हे संपूर्ण चराचर विश्व मीच आहे, या बद्दल जो स्थिर-ठाम आहे, इतके असून जर त्याला माझ्या भक्तीची आवड असेल तर मी अशा भक्ताला माझ्या मस्तकावरील मुकुट करतो। तो पहावा हे डोहाळे। म्हणौनि अचक्षुशी मज डोळे। हातीचेनि लीलाकमळे। पुजू तयाते॥२२३॥
दोवरी दो भुजा आलो घेउनि। आलिंगावयालागुनि। तयाचे अंग॥२२४॥ अशा भक्ताला पाहाण्याचे डोहाळे मला लागतात। मी वास्तविक अचक्षु-म्हणजे मला डोळे नाहीत, परंतु भक्ताला पाह्ण्यासाठी मला डोळे येतात। माझ्या हातातील लीला-कमळाने मला भक्ताची पूजा करावी असे वाटते म्हणून दोन हातांऐवजी मी ४ हात घेऊन आलो, माझ्या भक्ताला आलिंगन देण्यासाठी। इतके भक्त व देव यांचे एकमेकावर प्रेम असते। तया संगाचेनि सुरवाडे। मज विदेहा देह धरणे घडे। किंबहुना आवडे निरुपमु॥२२५॥ मी विदेही आहे, मला देह नाही, पण भक्तासाठी, भक्ताच्या संगती साठी मला देह धारण करावा लागतो।
तेणेसी आम्हा मैत्र। एथ कायसे विचित्र?
परी तयाचे चरित्र। ऐकती जे॥२२६॥
तेही प्राणापरौते। आवडती हे निरुते।
जे भक्तचरित्राते। प्रशंसिती॥२२७॥
इतकेच काय, पण माझ्या भक्तांचे चरित्र जे श्रध्देने ऐकतात व प्रशंसा करतात, ते सुध्दा मला प्राणापेक्षा ही आवडतात। यामुळेच भक्तीमार्ग सर्वात सुलभ व सर्वात श्रेष्ठ आहे।
समाप्त

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२