भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मौजे टोणगाव येथील गट नं. ५६१/१ ह्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर १९७४ साली नबाबाई शामा पाटील यांचे नाव वारस म्हणून लागले होते. सदर वारसाची संमती न घेता कदिरखान यांनी सदर जमीन विकत घेऊन स्वतःचे नाव लावून घेतले. काळानुसार जमीन भडगाव शहरात मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले, तसेच पाचोरा – चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग सदर जमिनीच्या लगतच असल्यामुळे शेतजमिनीला रहिवासी प्रयोजनाची मागणी देखील वाढली. परंतु प्लॉट पडल्यावर कायदेशीर वारस नबाबाई शामा यांची संमती असल्याखेरीज प्लॉट विकले जाऊ शकत ही बाब कळून चुकल्यामुळे कदिरखान यांनी तहसीलदार शीतल सोलाट यांच्यासोबत हात मिळवणी करत नबाबाई शामा ह्या कायदेशीर वारसाचे नावच ७/१२ उताऱ्यातून वगळल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
दरम्यान तहसीलदार शीतल सोलाट यांनी नबाबाई शामा यांचे नाव वगळल्याच्या दिवशीच जुना ७/१२ बंद करून रहिवासी प्रयोजनार्थ प्लॉट पाडल्याचे देखील आदेश घाई गडबडीत दिले. प्रकरणी नबाबाई शामा यांच्या सुन ताराबाई विठ्ठल पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली असता न्या. संतोष चपळगावकर यांच्यासमोर दिनांक २७ एप्रिल रोजी सुनावणी पार पडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तहसीलदार शीतल सोलाट तसेच कदिरखान यांना कारणे दाखवा नोटीस निघाली असून पुढील सुनावणी २२ जून रोजी ठेवली आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. भुषण महाजन (गुढे) यांनी उच्च न्यायालयातील कामकाज पाहिले.
राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांच्या, त्यांच्या परिवाराच्या ७/१२ उताऱ्यात महसूली अधिकाऱ्यांनी कलम १५५ अंतर्गत फसवणूक केल्याची बाब स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १८ मार्च रोजी विधानपरिषदेच्या सभागृहात अधिवेशना दरम्यान कबुल केली होती. महसूल खात्यात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी अनियमितता असून मोठ्या माणसांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून छोट्या माणसांना फसविण्याचे हे मोठे कार्टेल आहे, असे देखील म्हटले होते. त्यायोगे राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे, तसेच दोषी महसूली अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. कलम १५५ अन्वये महसूली अभिलेख्यांमधील केवळ चुकांची दुरुस्ती करता येते, दुरुस्तीच्या नावाखाली भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांनी वारसांची नावे कमी केल्याचा आरोप असून उच्च न्यायालयात याचिकाकर्त्याने शीतल सोलाट यांना बडतर्फ करण्याची विनंती केली आहे.


