भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात प्रचंड उन्हाचा तडाखा बसत आहे. याचा फटका एका बालकाला बसला आहे. भडगाव शहरातील आझाद चौकातील दीपक किसन पवार (पांचाळ) यांचा १३ वर्षीय मुलगा दिनेश याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दिनेश दीपक पवार (वय १३) सु.गि.पाटील विद्यालय भडगाव या इ.७ वी तील विद्यार्थ्याची दि. २१ रोजी खेळत असताना अचानक प्रकृती बिघडली. त्यास उलटी, जुलाबचा त्रास सुरू झाला. त्यास प्राथमिक उपचारासाठी भडगाव येथे दाखल करुन अधिक उपचारासाठी जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सायंकाळी त्याची प्रकृती अधिक खराब होऊन उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली.
यावेळी उपस्थित डॉक्टरांनी उष्माघातामुळे दिनेश मयत झाल्याचे सांगितले. आज दि २२ रोजी दिनेशचे जळगाव येथे शविच्छेदनानंतर भडगाव येथे दुपारी १ वाजता शोकमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिपक पवार यांचा आझाद पारंपरिक पांचाळ काम करण्याचा व्यवसाय असून कुटुंबाची अत्यंत गरिबीची परिस्थिती आहे. दिनेश हा अत्यंत हुशार व हजर जबाबी मुलगा होता. गरिबीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत पुढे मोठे अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. असे कुटुंबाने सांगितले. दिनेश यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ बहिण, काका, काकू, आजी असा परिवार आहे.