भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील निंभोरा गावातीलच तरुणांकडुन सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळुन निंभोरा येथील एका २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना तरवाडे पेठ ता. चाळीसगाव येथे दि. २१ रोजी मंगळवारी घडली. याबाबत चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. यावरुन भडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन निंभोरा येथील एकुण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश विकास पाटील (वय २१) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला निंभोरा गावातीलच काही तरुण मागील भांडणातुन सतत शारीरीक मानसिक छळ करीत होते. त्यामुळे कल्पेश याने आपल्या मावशीच्या गावी तरवाडे पेठ ता. चाळीसगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी विकास यादव पाटील रा. निंभोरा ता. भडगाव मयताचे वडील यांनी भडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन संशयीत देवेंद्र गोरखनाथ पाटील, कुणाल अनिल पाटील, अनिल बापु पाटील, आशा अनिल पाटील, समाधान मुरलीधर पाटील, विशाल प्रमोद पाटील, विशाल पोपट पाटील सर्व रा. निंभोरा. ता. भडगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ३ संशयीतांना अटक करण्यात आली आहे.
अटकेतील या तिन्ही संशयितांना दि. २२ रोजी भडगाव येथील भडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान एका महिलेसह ३ संशयीत फरार झालेले आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के हे करीत आहेत.