व्हॅगनार गाडी चालकाने दुचाकीस्वारास उडवले

भडगावात भीषण अपघात : २१ वर्षीय तरुण जागीच ठार

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव शहरातील यशवंत नगर भागातील २१ वर्षीय तरुण शेतात कामाला जात असताना समोरून येणाऱ्या व्हॅगनार गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात २१ वर्षीय दुचाकी स्वरास उडवले. यामध्ये तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. ८ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पाचोरा रस्त्यावरील आरटीओ ऑफिस जवळ घडली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला व्हॅगनार गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत फिर्यादी राजू रामचंद्र मोरे (वय ४४,  धंदा – मजूरी) यांनी फिर्याद दिली.  फिर्यादी राजू मोरे यांचा भाचा अजय गुलाब पवार हा त्याच्या एच. एफ. डिलक्स  गाडी क्र. एमएच ५४ ए ६३४५ या गाडीने मोटरसायकल वरून जात असताना आरटीओ ऑफिसजवळ त्याला मारुती सुझुकी व्हॅगनार एमएच १९ डीव्ही ०६४८ या गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत त्याच्या तोंडावर व नाकावर गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने तरुण जागीच मयत झाला.

मयत तरुणाचे मामा व मामी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पंढरपूरहुन भडगाव बस स्टॅन्डवर उतरून पायी घरी जात होते. त्यांना महादू भोई यांनी अपघाताबाबत माहिती दिली. दरम्यान मयताचे मामा राजू मोरे यांच्यासह विनोद मोरे, किशोर भालचे, दादू कांबळे यांनी तात्काळ अजयला सरकारी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. अपघातानंतर चार चाकी गाडीचा चालक गाडी सोडून पळून गेला होता.

दरम्यान भडगाव पोलीस स्टेशनला गु. र. न. २५४/२०२५  भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३, १०६(१), २८१, १२५(a), १२५(b), ३२४ (४) मोटरवाहन अधिनियम, १९८८, १८४ प्रमाणे वरील कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हे. कॉ. इक्बाल शेख हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.