भडगावात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत रंगणार!
शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी समोरासमोर : स्थानिक मुद्यांवर भर
भडगाव / सागर महाजन
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे ढोल वाजू लागले असून शहरात राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत असल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मोठ्या ताकदीने प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. स्थानिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून उमेदवार घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. शहरातील वातावरण बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा आणि कार्यकर्त्यांच्या वर्दळीमुळे चांगलेच तापले आहे. उमेदवारांकडून द्वारभेटीवर भर दिला जात असून विकासाचा मुद्दा पुढे केला जात आहे. वार्डावार्डात राजकीय चर्चा जोर धरत असून प्रचारसभांनी वातावरण अधिकच तप्त केले आहे.
नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे) गटाकडून रेखा प्रदीप मालचे, भाजपाकडून सुशिला शांताराम पाटील तर राष्ट्रवादी (अ.प.) गटाकडून सपना निजाम तडवी अशा तिघा उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली आहे. प्रत्येक उमेदवार स्वत:ला अधिक सक्षम, अनुभवसंपन्न आणि विकासाभिमुख ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. यापैकी शिवसेना (शिंदे) गटाची मागील पाच वर्षांत नगरपरिषदेवर सत्ता होती. त्यामुळे ही सत्ता पुन्हा राखण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी काटेकोर रणनीती आखली आहे. दुसरीकडे भाजप या वेळेस सत्ता खेचून आणण्यास पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी (अ.प.) गटाने देखील या निवडणुकीत दमदार पद्धतीने प्रवेश करून तिरंगी लढतीची रंगत वाढवली आहे. केंद्रात व राज्यात महायुती म्हणून सत्तेत असलेले पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.
नगरसेवक पदाच्या 24 जागांसाठीही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. जास्तीतजास्त प्रभागांमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात थेट लढत दिसते आहे, मात्र राष्ट्रवादी (अ.प.) गटाने 4 जागांवर उमेदवार उतारल्याने काही प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना उबाठा गटानेही या निवडणुकीत 3 जागांवर उमेदवारी दिल्याने लढतींची गुंतागुंत वाढली आहे. या सर्वांसोबत 13 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उतरल्याने अनेक प्रभागात मतविभाजन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होणार असून अपक्ष उमेदवारांचा फटका कुणाला बसतो हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.
अपक्ष उमेदवारांना उशिराने चिन्ह वाटप झाल्याने त्यांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळत नसल्याचे समोर आले आहे. उशिरा मिळलेल्या कालावधीचा फटका त्यांना बसणार की तेच कोणता ‘चमत्कार’ घडवून आणतील, याकडे स्थानिक मतदारांसह राजकीय पक्षांचे लक्ष आहे.
प्रचारात उत्साहाचे पर्व
गावभर प्रचाराचा जोर वाढला असून प्रचारात उत्साहाचे पर्व सुरू झाले आहे. सर्वच उमेदवार घराघरात संपर्क साधत आहेत. बाजारपेठा, चौक, वाड्या-वस्त्यांमध्ये उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींमुळे खूपच हालचाल वाढली आहे. रस्त्यावर बॅनर्स आणि पोस्टर्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी घोषणा देत, झेंडे घेऊन कार्यकर्ते प्रचाराची हवा रंगवत आहेत. थंडीचे वातावरण असूनही राजकीय तापमान मात्र सतत वाढत आहे. शहरातील चहाच्या टपरीवर, बसथांब्यावर आणि व्यापारी पेठेत एकच चर्चा फक्त ‘या वेळेस सत्ता कुणाच्या हातात जाणार?’ अशीच आहे.
भडगावातील मतदार विविध स्थानिक प्रश्नांकडे अपेक्षेने पाहत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, स्वच्छता, कारभार, बाजारपेठेतील मूलभूत सुविधा आणि शहर विकासातील मागे पडलेली कामे हे मुद्दे मतदार सातत्याने मांडत आहेत. हे सर्व प्रश्न लक्षात घेऊन उमेदवार मतदारांना विविध आश्वासने देत आहेत. बाहेरगावी असलेल्या मतदारांशी संपर्क साधून मतदानाच्या दिवशी ते शहरात येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेवटी नगरपरिषदेवर सत्ता कुणाची बसणार याचा निर्णय मतपेटीच देणार आहे. शिवसेना (शिंदे गट) पुन्हा सत्ता राखते की भाजप सत्ता खेचून आणते, की राष्ट्रवादी (अ.प.) गट आणि अपक्ष यांच्या मतविभाजनाचा प्रभाव समीकरणे बदलतात हे आगामी मतदानातून स्पष्ट होणार आहे.
नवख्यांची संख्या वाढली
या निवडणुकीत माजी नगरसेवक किंवा माजी पदाधिकाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसत आहे. मात्र त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत नवख्या उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळे मतदारांमध्येही नवीन चेहऱ्यांविषयी उत्सुकता व अपेक्षा दोन्ही निर्माण झाल्या आहेत.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील नगरपरिषद पुन्हा आपल्या ताब्यात राहावी यासाठी रणनीती आखत असून, कार्यकर्त्यांना संघटित करून प्रचारामध्ये जोर दिला आहे. त्याचवेळी भाजपकडून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, वैशाली सूर्यवंशी, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप पाटील यांनी मोठ्या ताकदीने मैदानात उतरून भाजपचा प्रचार वाढवला आहे. अलीकडेच भाजपात प्रवेश केलेल्या दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी आणि प्रताप पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद भडगावात आणि तालुक्यात वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.

