अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता प्रकरणाचा उलगडा !

0

अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता प्रकरणाचा उलगडा !

राजस्थानमधून तिन्ही मुली सुखरूप; तीन संशयित अटकेत ; जळगाव पोलिसांची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना २० ऑक्टोबर २०२५ रोजी उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादींच्या तक्रारीवरून भडगाव पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरविली.

गावातील फियांदीची पुतणीही त्याचवेळी बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली. पोलीस अधीक्षक  महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ तपास जलदगतीने करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू करण्यात आला.

चौकशीत बेपत्ता मुलींच्या संपर्कातील तीन युवकही गायब असल्याचे उघड झाले. सर्वांचे मोबाईल फोन बंद असल्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा बनला. पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून जळगाव व चाळीसगाव परिसरात शोधमोहीम सुरू केली.

जळगाव स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री १.२२ वाजता संशयित युवक आणि अल्पवयीन मुली दिसून आल्याचे स्पष्ट झाले. त्या वेळेत स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांची माहिती घेतली असता सर्व जण ‘झेलम एक्सप्रेस’ने पुढे गेल्याचा सुगावा लागला.

तांत्रिक तपास, नातेवाईकांची चौकशी आणि सातत्यपूर्ण माहिती गोळा करत पोलिसांनी राजस्थानातील अलवर जिल्ह्यातून सर्व संशयितांचा मागोवा घेत अखेर रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे, अजय सुकलाल देवडे आणि अमोल ईश्वर सोनवणे यांना ताब्यात घेतले. तसेच तीन्ही अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,  अपर पोलीस अधीक्षक नेरकर (चाळीसगाव विभाग) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपासात पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पो.उ.नि. सुशिल सोनवणे, पांडुरंग पाटील, पोना मनोहर पाटील,  महेंद्र चव्हाण, पोको प्रविण परदेशी, पोको मिलिंद जाधव, मपोका सोनु सपकाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी पालकांना सतर्क राहण्याचे आणि मुलांवर योग्य लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.