भडगाव शिवारात अतिवृष्टीमुळे शेती नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू
भडगांव – प्रतिनिधी

भडगाव तालुक्यासह शहरात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत महसूल विभाग व कृषी विभाग यांचे नुकसानीचे पंचनामे सुरू असून शेतात चिखल तुडवत पाण्यातून शेती पिकांचे झालेले नुकसान पाहणी करून पंचनामे सुरू आहे.
नाल्याला जास्त पाणी आल्याने शेतात पंचनामे करण्यासाठी जाण्यासाठी चक्क बैलगाडीतून पंचनामे करण्यासाठीं जावे लागत आहे.भडगाव ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे,सहाय्यक कृषि अधिकारी काजल ढोकळे , अजयकुमार साळुंखे,रितेश महाजन आदींसह महसूल विभाग शेतीवारांमध्ये जाऊन पंचनामे करीत आहेत. या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान आता तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीमुळे हिरावून नेला आहे. याबाबत
आमदार किशोरआप्पा पाटील यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः पाठपुरावा करून मंत्री महोदयांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्याकडून देखील शेती पिकाची सरसकट नुकसाभरपाईची मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. सदर अतिवृष्टी मुळे ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झालेले आहे व अजून पर्यंत पंचनामे झाले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित तलाठ्यांना संपर्क साधावा व पंचनामे करून घ्यावे अशी माहिती भडगाव ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे यांनी दै. लोकशाहीशी बोलताना दिली.


