भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क
येथे गेल्या 14 वर्षांपासून सर्प संवर्धन करणाऱ्या सर्पमित्र हर्षल भदाणे यांच्या प्रयत्नातून शहरातील खालची पेठ येथून नव्वद दिवसांआधी पकडलेल्या तस्कर मादी सापाला वाचवून त्या सापाने घातलेल्या 6 अंड्यांना कृत्रिमरित्या उबवून त्यापैकी 5 पिलांना जीवदान दिले. सर्व पिल्ले तंदुरूस्त असून त्यांना लवकरच वन विभागाच्या उपस्थितीत निसर्गात मुक्त केले.
भडगाव शहरातील खालच्या पेठेत 8 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्री साप निघाल्याची वर्दी नागरिकांनी बायोलॉजिस्ट आयडील ऑर्गनायझेशन संस्थेचे सर्पमित्र हर्षल भदाणे यांना फोनवरून दिली. संस्थेचे सर्पमित्र हर्षल भदाणे घटनास्थळी जाऊन ४.५ फुट लांबीच्या बिनविषारी तस्कर मादीस ताब्यात घेतले. त्याच रात्री या सापाने 6 अंडी दिली. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षद मुलानी, वनरक्षक मुकेश बोरसे यांना कळवण्यात आली. तस्कर मादा वाचली; पण अप्रत्यक्ष 6 अंड्यांची, पर्यायाने, 6 सापांची अतिरिक्त जबाबदारी सर्पमित्राच्या खांद्यावर आली. विषारी सापासारखे बिनविषारी साप अंड्यांच्या जवळ राहून त्यांना उबवत नाहीत. ते अंडी घालून निघून जातात. त्यामुळे निसर्गात अनेक संकट झेलत त्या अंड्यांतून 60 ते 70 दिवसानंतर पिल्ले निघतात.
अचानक घातलेल्या अंड्यांची आई होण्याशिवाय, सर्पमित्र हर्षल भदाणे यांच्यासमोर पर्याय नव्हता. त्यांनी हे आव्हान स्वीकारले व मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, जळगाव यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली अंडी 90 दिवस योग्य ती काळजी घेत कृत्रिमरित्या उबवली. उबवण्याच्या संक्रमणात अंड्यांची निगा राखणे, तापमान नियंत्रण, अंड्यांना बाधा होणार नाही, याची काळजी घेतली. 90 दिवसानंतर 5 अंड्यांतून पिल्ले बाहेर आली, तर एक अंडे हे बुरशी संसर्ग आणि खराब झाले.
हे चित्र पाहून सर्पमित्र हर्षल भदाणे यांना हायसे वाटले. सर्व पिल्ले वनविभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निसर्गात मुक्त करण्यात आले. भडगाव तालुक्यात सर्प वाचवण्यापासून सुरुवात करत हर्षल भदाणे हे बचाव ते संशोधन करत तालुक्यात आता वन्यजीव अभ्यासक म्हणून प्रचलित आहेत.