आंब्याचे महत्त्व आयुर्वेदानुसार

आंबा कसा खावा, आंबा कोणी खाऊ नये

0

लोकशाही विशेष 

आंबा फळांचा राजा, फळांमधील सर्वोत्तम, आंबा न आवडणारा व्यक्ती विरळच. आंब्याचा नुसता सुवास आला तरी मन प्रसन्न होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे फळ आहे. परंतु हा आंबा नक्की कधी कोणी कसा व किती खावा याविषयी अनेक गैरसमज आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया आयुर्वेदात आंब्याविषयी काय सांगितले आहे ??

आयुर्वेदात आंब्याचे संपूर्ण गुणधर्म, खाण्याच्या पद्धतींचे वर्णन आहे. साधारण अक्षय्यतृतीयेपासून आंबा खाण्यास सुरुवात करावी असे सांगितलेले आहे. कारण अक्षय्य तृतीयेपर्यंत आंबा व्यवस्थित पिकतो त्याआधी मिळणारा आंबा हा केमिकल्सचा वापर करून पिकवलेला असतो. त्यामुळे आरोग्यासाठी तो हानिकारक ठरू शकतो म्हणून शक्यतो अक्षय्य तृतीय आधी आंबा टाळावाच.

आयुर्वेदात ऋतुचर्या सांगताना त्या त्या ऋतूत मिळणारे फळ आवश्यक खावी असे सांगितले आहेत. कारण निसर्गतः या फळांची त्यावेळी शरीराला गरज असते. आंबा हा ग्रीष्म ऋतूत येणारे फळ आहे, म्हणून उन्हाळ्यात याचे अवश्य सेवन करावे. कारण उन्हाळ्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असतो त्यामुळे वात व पित्तदोष वाढून शरीरातील स्निग्धता कमी झालेली असते. शरीराला कोरडेपणा आलेला असतो शरीर शक्ती ही कमी झालेली असते आणि याचवेळी निसर्गाने आपल्याला आंबा उपलब्ध करून दिलेला आहे. आंब्यामुळे शरीरातील वातदोष कमी होऊन स्निग्धता वाढते शरीराची ताकद भरून येते.

आयुर्वेदात आंब्याचे गुणधर्म सांगताना..

पक्वं तु मधुरमृष्यम स्निग्धम बलसुख प्रदम |
गुरुवातहरम हृदयं वर्ण्यम शीतल पित्तलम|
कषायानुरसं वन्हिश्लेष्मशुक्र विवर्धनम ||

असे वर्णन आलेले आहे .

पिकलेला आंबा हा मधुर रसाचा असून रसरकतादी धातूंचे पोषण करणारा स्निथर शरीराला बल प्राप्त करून देणारा तसेच सुखप्रदम म्हणजेच शरीर व मनाला तृप्त करणारा सुख देणारा, पचायला थोडा जड, वात कमी करणारा, हृदयाला हितकारक, त्वचेचा वर्ण उजळणारा व त्वचेचे पोत सुधारणारा, प्राकृत कफनिर्मिती करणारा आणि पाचकाग्नी वाढवणारा तसेच शुक्रधातू वाढवणारा असा हा आंबा आहे.

आधुनिक शास्त्रानुसार आंब्यामध्ये विटामिन ए , बी सिक्स, सी हे आहेत तसेच भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट व फायबर आहेत. तसेच मॅग्नेशियम पोटॅशियम यासारखी खनिज द्रव्य ही आहेत. यामुळे आंबा हा आपल्या डोळ्यांसाठी, त्वचेसाठी केसांसाठी अतिशय उत्तम आहे. तसेच यातील अँटिऑक्सिडंटमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तसेच हा कॅन्सर विरोधी ही काम करतो. फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे हा सारक आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही याचा योग्य पद्धतीने खाल्ल्यास उपयोग होऊ शकतो.

आंब्याच्या असंख्य जाती उपलब्ध आहेत. हापूस, केशर, पायरी, लंगड्या, तोतापुरी, रायगड तसेच देशी वाणाचे गावरान आंबे. यामध्ये हापूस सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. हापूसमध्ये गर जास्त प्रमाणात असतो आणि रस कमी प्रमाणात असतो. त्यामुळे हापूस आंबा पचायला थोडा जड असतो, परंतु इतर आंबे जे गावरान आहेत त्यामध्ये रस जास्त असतो व गर कमी असतो त्यामुळे ते पचायला हलके असतात. आपापल्या भागात पिकणारा आंबा हा आपल्या प्रकृतीसाठी उत्तम असतो .

आंबा कसा खावा
आंबा खाण्याआधी कमीत कमी दोन ते तीन तास पाण्यात भिजवून ठेवावा. त्यामुळे त्यातील अतिरिक्त उष्णता कमी होते. आंब्यात असणारे फायटीक ऍसिड पाण्यात शोषले जाऊन ही उष्णता कमी होते व आंबा खाण्यासाठी उपयुक्त होतो. आंबा हाताने छान मऊ करून चोखून खाल्ला तर जास्त फायदेशीर ठरतो, असा आंबा खाल्ल्याने तो लवकर पचतो व त्याचे सर्व गुणधर्म आपल्याला मिळतात. आंब्याचा रस खाताना त्यात साखर किंवा गूळ घालू नये रस हा पचायला थोडा जड असतो म्हणून त्यात गायीचे साजूक तूप व किंचित मिरे पूड किंवा सुंठ घालून खावा . आंब्याच्या फोडी करूनही खाऊ शकतो.

फळांसोबत दूध घेऊ नये असे आयुर्वेदात सांगितले आहे. कारण हे विरुद्ध अन्न होते परंतु आंबा त्याला अपवाद आहे बरंका !! आंब्याच्या रसात दूध घालून म्हणजेच मँगो मिल्क शेक करून तुम्ही नक्कीच घेऊ शकता हे मिल्कशेक पचायला जड असून ते बलदायी असते. लहान मुले, तरुण मंडळी, खेळाडू , वजन वाढवण्यासाठी, शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या व्यक्तींसाठी हे मिल्कशेक उत्तम आहे.

डायबिटीसच्या लोकांनी आंबा खावा का ? तर हो.. अवश्य खावा. अर्थात त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. शक्यतो दिवसातून एखादा आंबा तोही चोखून खाल्ला तर डायबिटीसच्या लोकांना चालू शकते आणि हा आंबा खाताना इतर कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करावे. आमरसात साखर मिसळून मात्र खाऊ नये . वजन कमी करणाऱ्यांसाठी सुद्धा हेच पथ्य पाळून आंबा खाल्ला तर चालू शकतो मँगो मिल्कशेक मात्र त्यांनी टाळावे.

“अति सर्वत्र वर्जयेत” या उक्तीनुसार आंब्याचा अतिरेक मात्र टाळावा. आंब्यामुळे अजीर्ण झाले तर एक कप पाण्यात चिमूटभर सुंठ टाकून उकळावे व ते पाणी गरम असतानाच घोट घोट प्यावे यामुळे आंब्यामुळे झालेले अजीर्ण दूर होते . आंबा कोणी खाऊ नये.. ज्यांना आंबा नीट पचत नाही तसेच ज्यांना उष्णतेचे विकार सतत होतात. गळवे येतात अशा लोकांनी आंबा टाळावा. असा हा आंबा जो आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम आहे. तो योग्य पथ्य पाळून आवर्जून सर्वांनी खावा, कारण वर्षातून केवळ दोन महिनेच हा मिळतो पण वर्षभराचे लाभ करून देतो.

डॉ. लीना बोरुडे
आयुर्वेदाचार्य
पुणे
फोन 9511805298

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.