लोकशाही विशेष
‘तूप खाल्ल्याने रूप येतं’ ही म्हण प्रसिद्ध आहे. म्हणूनच तुपाचे अनेक फायदे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. लोण्याला कडवून त्यापासून तूप बनते. सर्व प्रकारच्या तुपामध्ये गाईचे तूप श्रेष्ठ समजले जाते. तुपाच्या सेवनाने धातूची वृद्धी होऊन शक्ती वाढते, मेंदू शांत राहतो, शरीरातील उष्णता दूर होते व रक्ताची शुद्धी होते. अतिरिक्त शारीरिक कष्ट करणाऱ्या लोकांनी तुपाचे सेवन करणे अत्यंत हितावह आहे.
भाकरी, पोळी किंवा खिचडीबरोबर तूप खातात. बाजरीची भाकरी व घट्ट तूप व त्याबरोबर वाटीभर दाट ताक प्यायल्यास ते घेणाऱ्याला बाहेरील जीवनसत्त्वे आवश्यकता नसते. जुन्या तुपाचा औषधासाठी वापर केला जातो. आयुर्वेदात जुने तूप अधिक गुणकारी मानले जाते. जुने तूप त्रिदोष, मूर्च्छा, कोड, विष, उन्माद, वायू, आकडी व दृष्टीदोष निर्माण करणाऱ्या तमिररोगात अत्यंत गुणकारी असते.
गाईचे कोमट तूप प्यायल्याने उचकी थांबते. गाईचे तूप आणि दूध एकत्र करून प्यायल्याने तृषाविकार नाहीसा होतो. रात्री झोपताना अर्धा शेर दूध गरम करून त्यात दोन चमचे तूप टाकून प्यायल्याने सकाळी पोट चांगले साफ होते. गाईच्या तुपाचे सकाळ – संध्याकाळ सात दिवसापर्यंत नस्य घेतल्याने किंवा नाकात तुपाचे थेंब टाकल्याने अर्धशीशी थांबते.
गाईचे तूप टाळूवर तसेच कानशीलावर घासल्याने पित्ताने दुखत असणारे डोके लगेच उतरते व आराम मिळतो. गाईचे ताजे तूप व दूध एकत्र करून डोळ्यांत घातल्याने डोळ्यातील शिरा लाल होण्याचे बंद होते आणि डोकेदुखीही थांबते. गाईचे तूप हातापायांना घासल्याने हातापायाची होणारी आग व शरीरात वाढलेली उष्णता नाहीशी होऊन शांत झोप लागते. जर डोळ्यात ऍसिड किंवा चुना पडला तर तूप डोळ्यात घातल्याने अराम वाटतो.
अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे
पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई
मो. ९८९२१३८१३२