पाळधी ता. धरणगाव

यावर्षी राज्यासह जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाबाबत अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाल्याचे विविध हवामान अंदाजांवरून दिसून येत आहे. काही भागात पूर्वमान्सूनच्या सरी कोसळल्या असल्या तरी बहुतांश ठिकाणी अद्याप पेरणीयोग्य व समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता पुरेसा व सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच खरीप पेरणी करावी, असे कळकळीचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असून शेतकऱ्यांचा प्रत्येक निर्णय हा त्यांच्या वर्षभराच्या उत्पन्नाशी निगडित असतो. अशा परिस्थितीत पावसाच्या दोन-चार सरींवर पेरणी करण्याचा मोह टाळणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या पावसानंतर दीर्घ खंड पडल्यास बियाण्यांची उगवण प्रभावित होण्याबरोबरच भविष्यात दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. परिणामी बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडतो.
कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आणि कृषी विभागाच्या सूचनांनुसार जमिनीत पुरेशी ओल निर्माण होईल इतका पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे हितावह ठरते. ७५ ते १०० मिलिमीटरपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्यानंतर तसेच जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक ओलावा निर्माण झाल्याची खात्री करूनच खरीप पेरणीचा निर्णय घ्यावा. केवळ कॅलेंडर पाहून नव्हे तर प्रत्यक्ष पावसाची स्थिती, हवामानाचा अंदाज आणि जमिनीतील ओल यांचा विचार करून पेरणी करणे अधिक सुरक्षित ठरते.
शेतकऱ्यांनी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. बियाण्यांची निवड, बियाणे प्रक्रिया, पिकांचे नियोजन आणि पेरणीची वेळ याबाबत शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी संयम आणि नियोजन या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.
घाईची पेरणी टाळा : पालकमंत्री
पालकमंत्री पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हा मेहनती, जिद्दी आणि संकटांशी दोन हात करणारा आहे. मात्र निसर्गाच्या अनिश्चिततेपुढे घाईपेक्षा संयम अधिक महत्त्वाचा असतो. शासन, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि दुबार पेरणीची वेळ येऊ नये, यासाठीच हे आवाहन करण्यात येत आहे. “थोडा संयम ठेवा, पावसाची खात्री करा आणि मगच पेरणी करा. घाईची पेरणी टाळा, दुबार पेरणीचे संकट टाळा,” असा संदेश देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना शास्त्रशुद्ध आणि जबाबदारीने खरीप हंगामाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.


