तिरुपतीच्या प्रसादात बीफ फॅट, माशांचे तेल अन लार्डसुद्धा?
प्रयोगशाळेतील अहवालावरुन समोर आली धक्कादायक बाब
हैदराबाद
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ख्याती प्राप्त असले मंदिर म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराची ओळख आहे. कोट्यवधी भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून लाडू देण्यात येतो. त्या लाडूत बीफ फॅट आणि माशांच्या तेलाचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे प्रयोगशाळेतील अहवालावरुन ही बाब समोर आली आहे. यामुळे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची तेलगु देसम पार्टी (टीडीपी) आणि वायएसआर काँग्रेस पार्टीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे.
टीडीपीने सेंटर ऑफ एनालिसिस अँड लर्निंग इन लाइव्हस्टॉक अँड फूड प्रयोगशाळेचा अहवाल जारी करत वायएसआर टीका केली आहे. वायएसआर पार्टीच्या सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात प्रसाद अन् लाड्डूमध्ये वापरण्यात आलेल्या तुपात पशूंची चरबी आणि माशांचे तेल मिळाले, असल्याचा आरोप केला आहे. वायएसआर काँग्रेसने चंद्रबाबू नायडू स्वत:च्या स्वार्थासाठी असे आरोप करत असल्याची टीका केली आहे.
मोफत जेवणच्या गुणवत्तेशी तडजोड
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मोठा आरोप केला होता. तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा हा धक्कादायक आरोप होता. नायडू यांनी दावा केला की, गेल्या ५ वर्षांत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केले आहे. त्यांनी ‘अन्नदानम’ म्हणजे मोफत जेवणच्या गुणवत्तेशी तडजोड केली. तिरुमालाच्या पवित्र लाडूंमध्येही तुपामध्ये प्राण्यांची चरबी वापरली. सीएएलएफ प्रयोगशाळेच्या अहवालात तुपात माशांचे तेल आणि बीफ टॅलोचे घटक मिळाले आहे. त्यात काही प्रमाणात लार्डसुद्धा आहे. लार्ड डुकरांचा फॅटी टिश्यूपासून काढण्यात येते.
वायएसआरचे ज्येष्ठ नेते वाय.व्ही.सुब्बा रेड्डी म्हणाले की, भगवंताच्या प्रसादात लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जाते, असे म्हणणे अकल्पनीय आहे. व्यंकटेश्वर स्वामींवर माझी श्रद्धा आहे. नायडूसुद्धा त्यांचे भक्त असल्याचा दावा करतात. यामुळे आपण देवासमोर शपथ घेऊया. नायडू यांचे आरोप राजकीय फायद्यासाठी आहे. देवच नायडू आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करेल.