मोठी बातमी : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर हल्ला
बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत हाणामारी
बीड लोकशाही न्यूज नेटवर्क
बीड जिल्हा कारागृहात सोमवारी सकाळी कैद्यांच्या दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर तुरुंगातच हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, आता आरोपींना तुरुंगात मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी सकाळी बीड कारागृहात दोन गटांत वाद सुरू झाला. या वादातून परळी येथील महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी सुदर्शन घुलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच वाल्मीक कराड यालाही कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे. सुदर्शन घुलेला झालेल्या मारहाणीमुळे तुरुंगातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच तुरुंग प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गोंधळ शांत केला. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची अधिकृत पुष्टी तुरुंग प्रशासनाने अद्याप केली नसली, तरी हल्ल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. सरपंच बापू आंधळे यांच्या खूनप्रकरणाशी संबंधित वादातून ही मारहाण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, कारागृहातील सुरक्षेच्या मुद्द्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.