बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच बीडमधील गुंडगिरीचे अनेक व्हिडिओ आता समोर येताना दिसत आहेत. बीडमधील आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय सतीश भोसले उर्फ खोक्याचा गुंडगिरीचे व्हिडीओ समोर आलेले आहेत. त्यानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या साडूंच्या टोळीकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये तो एका व्यक्तीला शेतात जबर मारहाण करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे बीडमधील सर्वच घटनांचं राजकारण होत असून व्हायरल व्हिडिओचा पॅटर्नच बीड जिल्ह्यात सुरू झालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या व्हिडिओंवरुन पोलीसही कारवाईला पुढे आले आहेत. या सर्व प्रकरणात बीड पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येत आहेत. बीडचे एसपी नवनीत कावत यांनी याबाबत माहिती दिली आहे. पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी मधुसूदन या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दादासाहेब खिंडकरचा मारहाणीचा व्हिडिओ एक वर्षांपूर्वीचा आहे. खिंडकर विरोधात बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादीची गरज असते, न्यायालयीन प्रक्रियेत तो महत्त्वाचा भाग असतो, असंही कावत यांनी म्हटलं.
दरम्यान, धनंजय देशमुखांनी हा व्हिडिओ जुना असून तो वाद कधीच मिटला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, दादासाहेब खिंडकरावर घरफोडी, पैसे उकळून फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचंही आता समोर आलं आहे.