बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क
बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच आता बीडच्या स्वराज नगर भागात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिक्षकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, फेसबुक पोस्टवर केलेल्या सुसाईड नोटवरून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बीड शहरातील स्वराज नगर भागात सकाळच्या सुमारास कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बाहेर एका व्यक्तीने एसीच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनंजय नागरगोजे असे या शिक्षकाचे नाव असून ते कोळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेवर शिक्षक होते.
2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित केले होते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे धनंजय नागरगोजे यांना अनेक अडचणी येत होत्या. धनंजय नागरगोजे यांनी होळीच्या दिवशी फेसबुक पोस्ट करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काही व्यक्तींची नावे देखील नोंदवली आहेत. आता यावरूनच पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
फेसबुक पोस्टमध्ये काय ?
श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालेच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले. काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला दोन रूपयांना फसवले नाही किंवा कुणाचे कर्ज पण घेतलं नाही. श्रावणी बाळा शक्य झालेच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ. कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला अजून काही कळत नाही तूझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचे नुकसान केले नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे.
यांनी केला छळ ?
विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल हाल करून मारणार आहेत. माझ्या मारण्याचे कारण म्हणजे मी फक्त विचारले होत की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झाले काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचे त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली आणि त्यातून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे.