ठाकरे चिडलेले आणि घाबरलेले, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली !

चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

0

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क 

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले असून, ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. सध्या त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडले. ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई महापालिकेची लूट केली असून, चोरांचे सरदार कोण आहेत, ते राज्याने पाहिले असल्याचा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.

दिंडोरी आणि नाशिकमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी बावनकुळे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला बावनकुळे यांनीही जशास तसे उत्तर देत प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा विकास करीत आहेत. दुसरीकडे ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई लुटली, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

महाविकास आघाडीचे नेते हरलेल्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे माणूस जेव्हा हरतो, तेव्हा असे विधान करतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले नसते, काँग्रेससोबत गेले नसते, तर त्यांना नैराश्य आले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित नव्हती ती चूक उद्धव ठाकरेंनी केली आहे. एका विशिष्ट समाजाची मते हवी असल्याने भगव्या ध्वजाला ठाकरे आता फडके म्हणतात. मताच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे आपल्या उंचीपेक्षा अधिक बोलत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

राज यांच्या मागण्या पूर्ण होतील

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या आहेत. ठाकरे यांच्या मागण्या पंतप्रधान मोदी नक्कीच पूर्ण करतील, असा दावाही त्यांनी केला. शरद पवारांना बारामतीत गल्लोगल्ली फिरावे लागले. त्यामुळे ते बारामतीत हरत असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.