तीनशे बँकांच्या व्यवस्थेत ‘भूकंप’! 

सायबर हल्ल्यामुळे युपीआय, एटीएम सेवा ठप्प

0

 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

रॅन्समवेअरच्या हल्ल्यामुळे देशातील जवळपास 300 छोट्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या दैनंदिन कामकाजाला फटका बसला. हा हल्ला ‘सी एज टेक्नॉलॉजी’ या तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा पुरवठादार कंपनीवर झाला. ही कंपनी छोट्या बँकांना दैनंदिन कामकाजविषयक तंत्रज्ञान उपलब्ध करते. या सायबर हल्ल्याचा फटका प्रामुख्याने स्टेट बँक आणि ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ची जॉइंट व्हेंचर कंपनी असणाऱ्या ‘सी एज टेक्नॉलॉजी’चे तंत्रज्ञान वापरणाऱ्या सहकारी आणि ग्रामीण क्षेत्रीय बँकांच्या ग्राहकांना बसला आहे.

या ग्राहकांना सध्या एटीएममधून रक्कम काढण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय त्यांना ‘यूपीआय’मधून रक्कम हस्तांतर करण्यात अडचण येत आहे. या संदर्भात अद्याप रिझर्व्ह बँकेकडून कोणतेही निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही; तसेच नेमके किती आर्थिक नुकसान झाले याचीही माहिती समोर आलेली नाही.

 

‘सी एज टेक्नॉलॉजी’वर हल्ला

देशातील पेमेंट सिस्टीमची देखरेख करणाऱ्या ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने (एनपीसीआय) ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला ‘सी एज टेक्नॉलॉजी’ या सॉफ्टवेअर कंपनीवर झाला आहे. या हल्ल्यामुळे कंपनीच्या काही सिस्टीम्सचे नुकसान झाले आहे. ‘या सायबर हल्ल्यामुळे आमच्याकडून हाताळण्यात येणाऱ्या रिटेल पेमेंट सिस्टीममधून सी एज टेक्नॉलॉजीला तात्पुरते हटविण्यात आले आहे. हे संकट निवारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत,’ असे ‘एनपीसीआय’ने स्पष्ट केले आहे.

सध्या या बँकांच्या पेमेंट व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत असून, तोपर्यंत ‘सी एज’ची सेवा घेणाऱ्या बँकांच्या ग्राहकांना व्यवहार पूर्ण करण्यात अडचणी येणार असल्याचेही ‘एनपीसीआय’तर्फे नमूद करण्यात आले.

 

हल्ल्यातून वाचण्यासाठी ‘हे’ करा!

* डेटाचा बॅकअप घेऊन ठेवा.

* कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

* त्रयस्थांकडून आलेल्या ई-मेल आणि सोबतची अटॅचमेंट डाउनलोड करू नका.

* हॅकर्सशी आर्थिक व्यवहार करू नका.

* अशा घटनांची माहिती त्वरित ‘सीईआरटी-इन’ आणि सायबर पोलिसांना कळवा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.