लोकशाही संपादकीय लेख
जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या जळगाव शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर जळगाव ममुराबाद रोडवर असलेल्या एल. के. फार्म हाऊस येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बनावट कॉल सेंटरवर जळगाव पोलिसांनी रविवारी धाड टाकून ते उध्वस्त केले. जळगाव शहर आणि जिल्हा आधीच अनेक बाबतीत बदनाम होत असतानाच आता या आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटर द्वारे विदेशातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकाराची आणखी एक भर पडली. पुणे मुंबई सारख्या मेट्रोसिटी मध्ये चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरसारखे केंद्र जळगाव सारख्या ठिकाणी सुरू होते, ही कल्पनाच करवत नाही. तथापि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा जळगाव मध्ये सुद्धा शिरकाव झाला, याला विशेषत्वाने महत्त्व देता येईल. एल. के. फार्म हाऊस हे अनेक बाबतीत कुप्रसिद्ध असल्याबाबतचा शिक्का आधीपासूनच बसला आहे. त्यात आता आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीची मोठी भर पडली आहे.
शहरापासून दूर अंतरावर शेतात फार्म हाऊस बांधण्याची अथवा उभारण्याची फॅशन अलीकडे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. शहरातील दूषित हवेपासून संरक्षण मिळवण्यासाठी अख्खे कुटुंबच्या कुटुंब फार्म हाऊसच्या खुल्या हवेत राहण्यास जातात. परंतु एल.के. फार्म हाऊस यासाठी कमी आणि इतर गोष्टींसाठीच उपयोगात आणले जात होते. मुळात अश्या कुकृत्यांसाठीच ते खूप प्रसिद्ध आहे. जळगाव शहराचे महापौर अर्थात प्रथम नागरिक हे पद उपभोगलेले ललित कोल्हे यांच्या मालकीचे हे फार्म हाऊस आहे. हे फार्म हाऊस जळगाव पासून दहा किलोमीटर इतके दूर असल्याने कसल्याही गर्दीचा अडथळा येथे नाही. या फार्म हाऊसवर जे बनावट कॉल सेंटर उभारले होते, ते मोठ्या शहरात असलेल्या कॉल सेंटरला लाजवेल असे आहे. एक ऑगस्ट पासून याची उभारणी केली आणि 9 सप्टेंबर 2025 पासून या कॉल सेंटरचे काम प्रत्यक्ष सुरू झाले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.
या कॉल सेंटरमध्ये एकूण 31 लॅपटॉप पोलिसांच्या छाप्यात मिळाले. 21 छोटे छोटे केबिन्स या फार्म हाउसमध्ये तयार केलेले आढळून आले. 9 सप्टेंबर पासून आतापर्यंत किती देशातील नागरिकांना फोन केले? हे तपासातून निष्पन्न होणार आहे. परंतु दोन लॅपटॉप ओपन असल्याने त्यातून काही डेटा उपलब्ध झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण 25 तरुण-तरुणी या कॉल सेंटरमध्ये रात्रीच्या वेळी काम करत होते. काल छापा टाकला तेव्हा रविवार असल्याने इतर शनिवार रविवारच्या सुट्टीवर बाहेरगावी गेल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्या ठिकाणी चार तरुण जे कलकत्त्याचे असल्याचे सांगण्यात आले, दोन जण ते कॉल सेंटर चालवणारे दोन बंधू आणि स्वयंपाकी तो ही मुंबईचा आढळून आला. असे एकूण सात जण पोलिसांनी छाप्यात आढळून आले. या सात जणांना तसेच एल.के. फार्म हाऊसचे मालक म्हणून ललित कोल्हे यांना त्यांचे घरून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या बनावट कॉल सेंटर वरील धाडीने हा जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चेचा विषय बनला. या धाडीत लॅपटॉप बरोबरच हुक्का पार्टी सुद्धा पोलिसांना मिळाली. हे सर्व जप्त करून सदर फार्म हाऊसला कुलूप ठोकण्यात आले आहे.
अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बनावट कॉल सेंटर उभारण्यामागे फार मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. ललित कोल्हे यांनी अनेक राजकीय पक्षात प्रवास करून आता ते माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. सत्ताधारी राजकीय पक्षाच्या आसरा घेऊन असे पैसे कमविण्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचे कॉल सेंटर त्यांनी उभारले असणार यात शंका नाही. यामागे अनेक बड्या राजकीय नेत्यांचा हात असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. विदेशी नागरिकांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याआधीच जळगाव पोलिसांनी हा गुन्हेगारी अड्डा उध्वस्त केला. त्याबद्दल जळगाव पोलिसांचे अभिनंदनच केले पाहिजे. परंतु पोलिसांनी याची बारकाईने चौकशी करून त्याचा छडा लावणे गरजेचे आहे. अन्यथा राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप झाला तर ती चौकशी अर्धवट सोडून त्यावर पडदा टाकू नये, हीच अपेक्षा. काल छापा टाकून या आठ जणांना ताब्यात घेऊन काल आणि आज पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याचे स्वतः अतिरिक्त पोलीस अधीक्षक नखाते यांनी पत्रकारांना सांगितले आहे. त्यामुळे हा अग्रलेख लिहीपर्यंत तरी गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यातच तेथे काम करणारे इतर वीस तरुण-तरुणींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पोलिसांना माहिती घ्यायची आहे. दरम्यानच्या काळात ज्या आठ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, ते बाहेर पडता कामा नये. अन्यथा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होण्याची शक्यता आहे.
या बनावट कॉल सेंटरची पाळेमुळे कुठपर्यंत रुजलेले आहेत? याचा तपास करणे महत्त्वाचे आहे. 31 लॅपटॉप कसे घेतले गेले? 21 छोटे केबिन बनवण्यासाठी पैसे कसे मिळवले? या कर्मचाऱ्यांना किती आणि कसा पगार दिला जात होता? त्याची तरतूद कशी आणि कोठून केली गेली? याचाही छडा लावणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात अनेक गुन्हेगारी कृत्य उघडकीस येत आहेत. त्यातलाच एक मोठा गुन्हेगारी कृत्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव सारख्या ठिकाणी कॉल सेंटरमध्ये काम करणारे तरुण-तरुणी यापूर्वी कुठे काम करीत होते? त्यांना त्याचा अनुभव किती आहे? वगैरे गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे. त्यातच तेथे हुक्का पॉट आढळून आले. याचा अर्थ तेथे ड्रग्सचे सेवनही होत असल्याने तेथे हॉलमध्ये झोपण्याची ही व्यवस्था केली होती. म्हणून सर्व बाबींचा बारकाईने तपास होणे आवश्यक आहे..!