बालविकास प्राथमिक विद्यामंदिर भडगाव येथे वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
भडगाव – प्रतिनिधी
येथील बालविकास प्राथमिक विद्यामंदिर शाळेत संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमात बोलताना विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि संस्थेची प्रेरणा, मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन व शिक्षकांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष साहेबराव महाजन, संचालक- शिवदास आप्पा महाजन, प्रकाश बच्छाव, संचालिका श्रीमती रेखा महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती रामकुवर, श्रीमती सोनाली महाजन, पालक प्रतिनिधी केदार साहेब, यशराज निकम सर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात शाळेत आयोजित विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा (रनींग, रस्सी खेच, लांब उडी) यांमधील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थी वेदांत बळीराम राठोड आणि आदर्श विद्यार्थिनी सृष्टी मछिंद्र वाघ यांचा सुद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
विशेष बाब म्हणजे, नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय एमटीएस स्पर्धेत भडगाव केंद्रातून विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
याव्यतिरिक्त, आमदार चषक – टीचर्स प्रीमियम लीगमध्ये विजयी ठरलेल्या संघात शाळेतील शिक्षक विकास झोडगे, सागर महाजन आणि सचिन महाजन यांच्या गटाला गटशिक्षणाधिकारी साहेब यांच्या हस्ते मानाची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीमती सुनिता सूर्यवंशी आणि श्रीमती अर्चना खांडेकर यांनी केले.
मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील शिक्षक अमोल बिऱ्हाडे, श्रीमती अंजली सोनवणे, श्रीमती रेखा महाजन, श्रीमती निपूर वानखेडे, श्रीमती सुजाता महाजन, श्रीमती रेखा पाटील आणि इतर सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह यामुळे हा बक्षीस वितरण सोहळा अविस्मरणीय ठरला.