जळगाव जिल्ह्यातील ४ लाख १० हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके; ३१ मेपर्यंत वितरणाची तयारी
जळगाव (प्रतिनिधी): राज्य सरकारच्या सर्व शिक्षासाठी मोफत पाठ्यपुस्तक वितरण उपक्रमाअंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जळगाव जिल्ह्यातील जवळपास ४ लाख १० हजार ९१८ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने ‘बालभारती’कडे पुस्तक संचांची मागणी सादर केली आहे. येत्या ३१ मेपर्यंत सर्व पुस्तके वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मराठी माध्यमातील ५६ हजारांहून अधिक पुस्तक संचांची मागणी
या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमासाठी एकूण ५६ हजार ८९८ पुस्तक संचांची मागणी करण्यात आली आहे. यात इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या २ हजार ४२८ संचांचा देखील समावेश आहे.
तालुकानिहाय विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे:
अमळनेर : २७,३९७ , भडगाव : १८,०२६ , भुसावळ : २७,८६४ , बोदवड : ९,७५४ , चाळीसगाव : ५४,२१६ , चोपडा : ३८,८८४ , धरणगाव : १०,२५९ , एरंडोल : १८,२५० , जळगाव : २४,४०० , जामनेर : ४३,००० , मुक्ताईनगर : १०,४८५ , यावल : २०,९०२ , रावेर : ३१,९८५ , पारोळा : २२,९५५
जिल्हा पातळीवरून तालुका व केंद्रांपर्यंत होणार वितरण
बालभारती पुणे येथून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा प्रथम जिल्हास्तरावर केला जाणार असून, त्यानंतर तालुका व शाळा केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचवण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून, विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळावीत यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले.